‘लग्न’ हा आयुष्यात येणारा मोठा बदल! जोडीदाराबरोबर नवं आयुष्य सुरू करणं मनाला जितकं सुखावणारं असतं तितकाच ‘लग्न’ हा शब्द अनेकांचं आणि अनेकींचं मन चिंतेनं भरुन टाकतो. प्रत्येकाचं असणारं स्वतंत्र अस्तित्व लग्नानंतरही तसंच अबाधित राहील का, हा त्यातला पहिला प्रश्न..
प्रश्न – मी सध्या उच्चशिक्षण घेत आहे. माझ्या एका मित्राला मी आवडते असं त्यानं नुकतंच मला सांगितलं. त्यानं त्याच्या मनातली गोष्ट सांगितल्यावर मी त्याचा जोडीदार म्हणून विचार करून पाहिला. जोडीदाराबद्दलच्या माझ्या अपेक्षांमध्येही तो बसतो. खरा प्रश्न पुढेच आहे! लग्नानंतर त्या जोडीदाराबरोबर, त्याच्या घरच्यांबरोबर माझं आयुष्य कायमसाठी जोडलं जाणार, आयुष्य पूर्वीसारखे राहणारच नाही या कल्पनेनंच मला कसंतरी वाटू लागलं. लग्न झाल्यावर माणसं बदलून जातात, मला बदलायचं नाहीये. लग्नाबरोबर येणाऱ्या ‘कमिटमेंट्स’ पाळता पाळता माझं ‘मी’ म्हणून असलेले अस्तित्वच नाहीसं होईल की काय याची भीती वाटते.
उत्तर- लग्नाबरोबर काय-काय बदल होणार याची तुम्हाला जाणीव होऊ लागलीय. भारतात तरी आपली ओळख ही कुटुंबाशी घट्ट जोडलेली असते, हे सत्य आहे; त्यामुळं असं कुणाशी, त्याच्या कुटुंबाशी कायमचं जोडलं जायला नको वाटत असेल, तर अजुन आपला लग्नाबद्दलचा विचार परिपक्व झालाय असं दिसत नाही. कदाचित तुम्ही या तुमच्या मित्राशी लग्न करु शकलात, तर पुढे ही गोष्ट उलगडत जाईलही. तो आणि त्याचं कुटुंब तुमच्याशी किती जुळवून घेतात, किती तयारी दाखवतात, यावरही ते अवलंबून असेल. पण मुख्य प्रश्न असा आहे की या बदलाला आपण तयार आहोत का, असलो तरी ते आपल्याला उमगतंय का? आणि जर ते सहज, हळू-हळू घडत जाणार असेल, तर त्या भावना अन् प्रसंग अनुभवताना दरवेळी आपली बुद्धी आपल्याला वाईट ‘स्पीड ब्रेकर’वरून नेणार का? त्यामुळं आपला आनंदाचा प्रत्येक क्षण हा ‘कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन’ची धून ऐकवणाऱ्या अस्मितेचा डंख होऊन तुम्हाला दु:ख देणार का? आणि तुम्ही तुमच्या जवळच्या मैत्रिणीला ‘लग्न?, अजिबात करू नकोस!’ किंवा ‘आधी गोड-गोड बोलणारा मित्र नवरा म्हणून कसा भयंकर प्राणी असतो, अन् त्याच्या घरच्यांना कसं वेळेवरच दूर ठेवलंच पाहिजे,’ असे सल्ले देणार का?
तुमच्या मनासारखा सल्ला मी देत नाहीये ना? धक्काच बसला असेल कदाचित तुमच्या वैचारिक अन् बौद्धिक भूमिकेला. पण फक्त लेखी, तेही एकाच भेटीत सांगायचं, तर मलाही थोडीशी रिस्क घ्यायलाच हवी.
लग्नाविषयीच्या तुमच्या भावनांवर जसं तुमचं आयुष्य अवलंबून आहे, तसं तुमच्या होणाऱ्या नवऱ्याचंही आहे, त्यांच्या कुटुंबाचंही आहे, अन् होणाऱ्या मुलाबाळांचं, त्यांच्या विकासाचंही आहे. म्हणजे बघा हं, एक हुशार, विचारी, पुरोगामी अन् स्वतंत्र मुलगी ही आपली आताची ओळख. त्यात आता इतक्या इतर सुप्त ओळख असतील, अशी कल्पना तुम्ही बहुतेक केली नसेल. तुम्ही समंजस, खुल्या विचारांच्या, बुद्धिमान, पुरोगामी, हक्कांविषयी जागरूक अशा पत्नी पण व्हाल. जशी पत्नी व्हाल, त्यातून पुढे कशी आई व्हाल, या भूमिका अन् ओळख याविषयीच्या शक्यता उलगडणार आहेत. चालू सेमिस्टरचे पेपर बरोबर सोडवले, तर पुढचे बरोबर सुटण्याची शक्यता जास्त, हे तर तुम्हाला अनुभवातून मान्य व्हायला हरकत नसावी. त्यामुळं थोडा जास्त विचार करु या, आणि तो दुसऱ्याशी ताडून बघू या.
तसं पण तुमच्या मित्रानं तुम्हाला फक्त तुम्ही आवडता इतकंच सांगितलंय. लग्नाबद्दल अजुन कुणीच बोललेलं नाही. तरी पण तुम्ही मनातल्या मनात तसा विचार करुन ठेवणं वाईट नाही किंबहुना आवश्यकच आहे. पण हातातलं सेमिस्टर सोडून याच्यामागे धावावं का, हा पण एक विचार केला पाहिजे. किंवा आपली फसरत होत नाहीये ना, ही पण शंका ठेवली पाहिजे. पण मला बदलायचंच नाहीये, असं म्हणणं म्हणजे, ‘‘दात येणं ही फारच त्रासदायक गोष्ट आहे, बाई! त्यापेक्षा मी आयुष्यभर बाटलीनंच दूध पिईन की,’’ असं म्हणण्यासारखं आहे.
लग्नाबरोबर येणाऱ्या ‘कमिटमेंटस्’ पाळता पाळता आपली ओळख अजुन वेगवेगळ्या मितींमध्ये उलगडत जाईल, अस्तित्व नाहीसं वगैरे काही होणार नाही, हे पटतंय उमगतंय का बघा. सगळं कदाचित तुम्हाला पटणारही नाही अन् तशी गरजही नाही. पण तुमचा तुम्हाला योग्य निर्णय योग्य वेळी घेता आला की झालं!
paralikarv2010@gmail.com
विचारी मना! : यंदा कर्तव्य आहे; पण..!
‘लग्न’ हा आयुष्यात येणारा मोठा बदल! जोडीदाराबरोबर नवं आयुष्य सुरू करणं मनाला जितकं सुखावणारं असतं तितकाच ‘लग्न’ हा शब्द अनेकांचं आणि अनेकींचं मन चिंतेनं भरुन टाकतो.
First published on: 18-04-2015 at 01:07 IST
मराठीतील सर्व Health इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Separate existence possible after marriage