सर्दी हा तसा साधा आजार. पण एकदा सर्दी झाली की ती तितकीच बेजारही करते. सर्दीचेही वेगवेगळे प्रकार आहेत. कोणती सर्दी नेमकी कशामुळे होते याविषयी सांगताहेत कान- नाक- घसा तज्ज्ञ -डॉ. निखिल गोखले.
नाक बंद होणे, शिंका येणे, नाकातून पाणी वाहणे म्हणजे सर्दी. त्याच्या जोडीने डोके दुखणे, ताप येणे, घसा दुखणे अशाही तक्रारी उद्भवू शकतात. सर्दी मुख्यत्त्वे दोन प्रकारची असते- अॅलर्जिक सर्दी आणि जंतूसंसर्गाने होणारी (इन्फेक्टिव्ह) सर्दी.
अॅलर्जिक सर्दीतही दोन प्रकार आहेत. काही जणांना वर्षभर सर्दी असते. तर काहींना फक्त काही ऋतूंमध्ये- प्रामुख्याने पावसाळ्यात आणि हिवाळ्यात सर्दीचा त्रास होत असतो. नाकात धूळ गेली, तीव्र वास आला की व्यक्तीला एखाद्- दुसरी शिंक येते, नंतर थोडा वेळ नाकातून पाणी आल्यासारखेही वाटते, नाकात खाज सुटते, किंवा कधी नाक बंद होते. नाकात जे काही गेले आहे त्याला मिळणारा हा सर्वसाधारण प्रतिसाद असतो. हा प्रतिसाद वाढीव स्वरूपात दिसू लागला तर त्याचे रुपांतर अॅलर्जिक सर्दीत होते. धुळीमुळे, तीव्र वासामुळे किंवा वातावरणात नेहमीचे बदल झाल्यामुळेही खूप शिंका येत राहणे, नाकातून खूप वेळ पाणी येत राहणे असे त्रास अॅलर्जिक सर्दी असलेल्या व्यक्तींना होतात. गरम हवेतून गार हवेत जाण्यामुळे किंवा अगदी सकाळी उठल्यानंतर वातावरणात जो बदल जाणवतो त्यामुळेही या व्यक्तींना सर्दी होते.
काही जणांना विशिष्ट ऋतूतच या तक्रारी जाणवतात. पावसाळ्यात भिंतींवर ओल येऊन काळ्या- पांढऱ्या ठिपक्यांची बुरशी येते. या बुरशीचे कण हवेत मिसळल्याने काहींना सर्दीचा त्रास होतो. तर काहींना सकाळी उठताच शिंका सुरू होतात. नाकातून पाणी येऊ लागते. सकाळी साधारणपणे नऊ- दहा वाजेपर्यंत ही सर्दी टिकते. नंतर त्रास कमी होतो. दिवसभर ‘सर्दी’ हा शब्दही आठवत नाही! पुन्हा संध्याकाळी सर्दी डोके वर काढते.
सर्दीचा दुसरा प्रकार म्हणजे जंतूसंसर्गामुळे होणारी सर्दी. यातही वेगवेगळ्या विषाणूंमुळे होणारी सर्दी (कॉमन कोल्ड) आणि जीवाणू संसर्गामुळे होणारी सर्दी, असे दोन प्रकार आढळतात. एकदा विषाणूसंसर्गामुळे सर्दी झाल्यानंतर शरीरात त्या विषाणूविरूद्ध रोगप्रतिकारशक्ती तयार होत असते. पण दर एक किंवा दोन महिन्यांनी विषाणू आपले आवरण (अँटीजेन/ कॅप्सूल) बदलत असल्यामुळे शरीरात तयार झालेली आधीच्या आवणाविरोधातील प्रतिकारशक्ती पुरी पडत नाही आणि दर एक-दोन महिन्यांनी पुन्हा सर्दी होण्याची शक्यता उद्भवते. ऱ्हायनोव्हायरस, एन्फ्लुएन्झा व्हायरस, अॅडिनोव्हायरस अशा विविध विषाणूंमुळे ही सर्दी होते. यातील एन्फ्लुएन्झा व्हायरसमुळे तापही येतो. मात्र इतर प्रकारच्या सर्दीसाठी फार औषधे घेण्याची गरज पडत नाही. विश्रांतीनेही ती बरी होते.
जीवाणूंमुळे होणारी सर्दी मात्र लगेच बरी होत नाही. ती बरेच दिवस राहू शकते. ही सर्दी सहसा रुग्णाला विषाणूमुळे झालेली सर्दी ओसरल्यानंतर होते. विषाणूंमुळे होणाऱ्या सर्दीत रुग्णाच्या नाकाच्या त्वचेला खूप सूज आलेली असते, तसंच काही रुग्णामध्ये सर्दीमुळे नाकात तयार होणारे पातळ पाणी नाकाच्या त्वचेत अडकून राहण्याची प्रवृत्ती असते. अशा वेळी त्या ठिकाणी जीवाणूंचा संसर्ग होतो. काही जणांच्या नाकाची आंतररचनाच पातळ पाणी त्वचेत अडकून राहण्यास कारणीभूत ठरणारी असू शकते. त्यांना या प्रकारची सर्दी वारंवार होते. नाक बंद होणे, जोडीला ताप येणे, नाकातून घट्ट पिवळ्या रंगाचा शेंबूड येणे, घसा, डोके दुखणे अशी या सर्दीची लक्षणे असतात. साध्या भाषेत याला ‘सर्दी मुरली’ असे म्हटले जाते!
नाकातून फुफ्फुसात जाणाऱ्या हवेचे तापमान आपल्या शरीराच्या तापमानाएवढे ठेवणे हे नाकाचे प्रमुख काम असते. बाहेरचे तापमान कितीही असले तरी नाकातून फुफ्फुसात जाताना हवेचे तापमान शरीराच्या तापमानाइतकेच केले जाते. यासाठी नाकात उंचवटय़ांसारखी रचना असते. त्यांना ‘टर्बिनेटस्’ किंवा ‘मस्से’ म्हणतात. या टर्बिनेडस्च्या आत रक्तवाहिन्यांचे जाळे असते. उन्हाळ्यात टर्बिनेटस्ना फारसे काम करावे न लागल्यामुळे ते आकुंचन पावतात. पण थंडीत मात्र बाहेरील हवाच थंड असल्यामुळे त्यांना अतिरिक्त काम करायला लागून ते प्रसरण पावतात. वातानुकूलन यंत्रणा सुरू करून झोपल्यानंतर व्यक्तीचे नाक बंद होण्याची प्रक्रिया यामुळेच घडते. सर्दी झाल्यावरही नाकात सूज आल्यामुळे नाक बंद होते.
चेहऱ्याच्या हाडांत हवेच्या थैल्या (सायनस)असतात. त्यात सतत पातळ स्त्राव (म्यूकस) बनत असतो. हा स्त्राव नाकात उतरतो. नाकात बाहेरून येणारी धूळ, घाण थेट घशात न जाता या स्त्रावाला चिकटते. जीवाणूंमुळे होणाऱ्या सर्दीच्या प्रकारात हा पातळ स्त्राव सायनसेसमध्ये अडकून राहतो आणि त्यात जीवाणूंच्या कॉलनीज् होतात. काहींच्या नाकाची आंतररचना सामान्य नसल्यामुळे स्त्राव सायनसमध्ये अडकून राहण्याची प्रवृत्ती दिसते. या कारणामुळे होणारी सर्दी (सायन्युसायटिस) दहा- पंधरा दिवस टिकते.
नाकाची आंतररचना सामान्य नसण्यातही काही प्रकार आहेत. नाकाचे वाढलेले हाड हा त्यातलाच एक प्रकार. यात नाकाच्या मध्यभागी असलेला पडदा सरळ न राहता एका बाजूस झुकलेला असतो. पण केवळ या एकाच कारणामुळे व्यक्तीला सायन्युसायटिस प्रकारची सर्दी होते असे म्हणता येणार नाही. नाकाच्या अंतर्गत रचनेत प्रत्येक सायनसचे तोंड नाकात उघडत असते. नाकात उघडणाऱ्या सायनसच्या तोंडाचा आकार लहान झाला किंवा तेथे हवा खेळण्याची प्रक्रिया नीट होत नसेल तरीही सायन्युसायटिस होतो. काही व्यक्तींची नाकाच्या हाडाची शस्त्रक्रिया करूनही त्यांचा सायन्युसायटिसचा त्रास थांबत नाही. त्यांना या दुसऱ्या प्रकारचा त्रास असतो. मात्र आता दुर्बिणीद्वारे ‘एनडोस्कोपिक’ शस्त्रक्रिया केल्या जात असल्यामुळे व्यक्तीची ही तक्रारही दूर करता येते. वेगवेगळ्या प्रकारच्या सर्दीवर उपाय काय, मुळात सर्दी होऊच नये म्हणून काय काळजी घ्यावी, याविषयी जाणून घेऊ पुढील आठवडय़ात.
२० एप्रिल रोजी ‘हेल्थ इट’मध्ये प्रसिद्ध झालेला ‘निरोगी दातांसाठी..’ हा लेख डॉ. अश्विनी पाटोळे यांचा होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा