उन्हाळा आणि थंडपेये हे सर्वाचे लाडके समीकरण! ही पेये उकाडा सुसह्य़ करत असली तरी त्यातली बहुतांश पेये खूप गोड असतात. उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील पाणी कमी होत असताना शरीराला पुरेशी साखर आणि क्षार मिळणे जसे आवश्यक असते तसेच अतिरिक्त साखर पोटात जाऊ नये याकडेही लक्ष ठेवावे लागते. पण मनात आणले तर हा तोल नक्की सांभाळता येतो. पेयात भारंभार साखर न घातता चव आणण्यापुरती साखर घालून देखील  तरतरी देणारी उन्हाळी पेये बनवता येतात.
साखर म्हणजे पिष्टमय पदार्थच. रोजच्या आहारात ६० ते ६५ टक्के चांगल्या प्रतीचे पिष्टमय पदार्थ असायला हवेत, अर्थात म्हणजे फक्त साखरच खावी, असे नक्कीच नाही. चांगल्या प्रतीचे पिष्टमय पदार्थ रक्तातील ग्लुकोजची पातळी योग्य राखण्यासाठी मदत करतात, पण ‘रीफाइन्ड शुगर’मुळे रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढू शकते. जेव्हा सतत साखर पोटात जाते, तेव्हा या सर्व गोष्टींचा विचार करायला हवा. साखरेची आवड आपण लहानपाणापासून जशी लावून घेऊ तशी ती जोपासली जाते. जास्त साखर घातल्याशिवाय अनेकांना तो पदार्थ गोड असल्यासारखे वाटतच नाही! उन्हाळ्यात थंडपेये पिताना हा मुद्दा लक्षात ठेवूया. ही पेये दिवसात खूप वेळा प्यायली जात असल्यामुळे त्यात चवीसाठी साखर असली तरी साखरेच्या पाकाचे स्वरुप नक्कीच नसावे! लहान बाळांसाठी ‘ओआरएस’चे पाणी तयार करताना त्यात किती साखर घातली जाते ते आठवा. थंडपेयांमध्येही तशाच प्रकारे प्रमाणातच साखर आणि मीठ घालणे योग्य.
ही पेये घ्या !
* उन्हाळ्यासाठी नारळपाणी उत्तमच. यात वरून साखर अजिबात नसते.
* लिंबूपाणी किंवा लिंबाच्या सरबतात साखरेऐवजी थोडासा गूळ आणि पुदिना घालून पहा.  
* पातळ ताजे ताक. त्यावर काळे मीठ, पुदिना, जिरे घालता येईल.
* कोकम सरबताचे तयार सायरप खूप गोड असते. कधीतरी घरच्या घरी कोकम सरबत करून पहा. बाजारात सुकी कोकमे मिळतात. असे कोकम कोमट पाण्यात भिजत घालायचे आणि त्यात साखर आणि गरज भासल्यास मीठ घालून सरबत करावे. यात साखरेचे प्रमाण सायरपपेक्षा थोडे कमी करता येते.
* काकडी आणि टोमॅटोचा पातळ रस करता येईल. काकडीचे तुकडे थोडा बर्फ आणि पाणी घालून मिक्सरमध्ये वाटायचे, हे मिश्रण गाळायची गरज नसते, शिवाय काकडीच्या रसाला सखर देखील लागत नाही. काळे मीठ घालून हा रस छान लागतो. टोमॅटोत बिया असल्यामुळे टोमॅटोचा रस मात्र गाळावा लागतो. टोमॅटो जरासा आंबट असल्याने त्यात थोडीशी साखर घालायला लागते. काळी मिरी पावडर आणि काळे मीठ भुरभुरून हा रस छान लागतो.
* कलिंगडाचा रस.
*  सौंफ पाणी (बडिशेपेचे सरबत)- हे पेय उन्हाळ्यात छान तरतरी आणते. एक लिटर पाण्यात मूठभर बडिशेप घालून ते उकळावे आणि न गाळता फ्रिजमध्ये ठेवावे. सरबत करायच्या वेळी त्यात थोडा लिंबाचा रस, चवीपुरती साखर आणि काळे मीठ घालून प्या.
*  बार्ली वॉटर (जवाचे पाणी)- मूठभर बार्ली एक लिटर पाण्यात १०-१५ मिनिटे शिजवा आणि बडिशेपेच्या सरबातासारखेच सरबत करा. या दोन्ही प्रकारच्या सरबतांमध्ये साखरेऐवजी गूळ वापरता येईल. गुळाची पावडर वापरल्यास सरबत करणे सोपे होईल.   
* पुदिन्याचे पाणी- एका बाटलीत साध्या पाण्यात पुदिन्याची ५-६ पाने चुरून घाला आणि फ्रिजमध्ये गार होण्यासाठी ठेवा. या पाण्यात साखर देखील घालण्याची गरज नाही. साध्या पाण्याला पुदिन्याचा छान वास लागतो.
*  साधे दूध किंवा फ्लेवर्ड दूधही चांगले. खजूर किंवा अंजिर खलबत्त्यात चांगले कुटून दुधात घातले तर दुधाला छान वासही लागतो. खजूराचा तुकडा तोंडात आला तर तो खाऊन टाकावा. अशा दुधात वेगळ्याने साखर घालावी लागत नाही.   

Story img Loader