‘उन्हाळा सुरू झाला आणि अॅसिडिटीही सुरू झाली,’ हे वाक्य अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळतं. उन्हाळ्याचा आणि आम्लपित्ताचा खरंतर एकमेकांशी काही संबंध नाही. तरीही उन्हाळ्यात अनेकांना आम्लपित्त का होतं हे जाणून घेऊया-
उन्हाळ्यात शरीरातलं पाणी कमी होत असतं. त्यामुळं पोटात स्त्रावणाऱ्या आम्लांची तीव्रता अधिक होते. शिवाय उन्हाळ्यात आमरसासारखे पचायला जड पदार्थ भरपूर खाल्ले जातात. सुट्टीच्या दिवशी अनेक जण अधिक काळ घरात राहणंच पसंत करतात. अशा परिस्थितीतही खाणंअधिक होतं. शरीराला हालचाल कमी असल्यामुळं पोटात तयार झालेलं आम्ल खाली सरकून जाण्याची प्रक्रिया लांबते आणि आम्लपित्ताचा त्रास उद्भवतो. पण फक्त उन्हाळ्यातच किंवा उन्हामुळंच आम्लपित्त होतं असं म्हणणं चुकीचं आहे.
प्रमुख लक्षणं काय?
* पोटात गरम झाल्यासारखं वाटणं
* आंबट ढेकर येणं
* तोंडात आंबट पाणी येणं
* छातीत जळजळ होणं
* जेवल्यानंतर लगेच पोट खूपच भरल्यासारखं वाटणं
* पोटाच्या वरच्या भागात फुगारा धरल्यासारखं वाटणं
आईस्क्रीम खाल्ल्यानं आम्लपित्त कमी होत नाही!
अनेक जण आम्लपित्त झाल्यावर लगेच आईस्क्रीम खातात, किंवा थंड दूध पितात. तसं केल्यावर काही काळ त्यांना बरंही वाटतं. पण
खरंतर आईस्क्रीम आणि दूध या दोन्हीत भरपूर
क्रीम (फॅट) असतं. खाल्लेल्या अन्नात जितकं
फॅट जास्त, तेवढी पोटातून अन्न पुढे सरकण्याची प्रक्रिया मंदावते. त्यामुळं आम्ल पोटात खूप वेळ
तुंबून राहतं. आम्लपित्त झाल्यावर पोटात जी
गरम झाल्यासारखी भावना होते, ती आईस्क्रीम खाल्ल्यामुळं तात्पुरती थांबते. पण त्यापुढे
दोन-तीन तासांनी त्या व्यक्तीचं आम्लपित्त अधिक वाढतं.
आम्लपित्त झाल्यावर लगेच काय खावं?
* लाह्य़ा
* आम्ल गुणधर्म नसलेली फळं किंवा अशा फळांचे रस
* दही आणि दह्य़ाचे पदार्थ आम्लपित्तात चालू शकतात. घुसळलेल्या ताकातलं फॅट निघून गेलेलं असल्यामुळे ताक प्यायल्यास चालेल. दही, लस्सीही चालेल.
आम्लपित्त टाळण्यासाठी-
* भरपूर पाणी प्यावं.
* एकदाच खूप न खाता थोडय़ा-थोडय़ा वेळानं थोडं-थोडं खावं.
* खूप तळलेले, तूप, लोण्याचा खूप वापर असलेले पदार्थ कमीच खावेत.
* ज्यांना आम्लपित्ताचा त्रास होतो त्यांनी मसालेदार पदार्थ टाळावेत.
* जेवण झाल्याबरोबर लगेच आडवं न झोपणं महत्वाचं.
* जेवणात भरपूर तंतूमय पदार्थ (फायबर) हवेत. गवार, चवळीसारख्या शेंगभाज्या, आख्ख्या गव्हाची पोळी, ज्वारीची भाकरी हे पदार्थ आहारात जरूर घ्यावेत.
उन्हाळा आणि आम्लपित्त
‘उन्हाळा सुरू झाला आणि अॅसिडिटीही सुरू झाली,’ हे वाक्य अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळतं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 13-05-2014 at 06:34 IST
मराठीतील सर्व Health इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Summer and bile acid