कडक ऊन आणि प्रचंड घाम अशा परिस्थितीत त्वचेच्या तक्रारी ठरलेल्याच. उन्हामुळे त्वचा काळी पडणे, उकाडय़ाने त्वचेवर फोड किंवा पुरळ उठणे, गोवर व कांजिण्यांचे फोड या नेहमीच्या तक्रारी. यावर काही प्राथमिक घरगुती उपचार करता येतील.
उन्हामुळे त्वचा रापणे/ काळी पडणे
* भिजवलेली मसूर डाळ वाटून त्याची पेस्ट करावी. ही पेस्ट १ चमचा घेऊन त्यात २ चिमूट हळद आणि थोडेसे कच्चे दूध घालून पातळसर मिश्रण तयार करावे. या मिश्रणाचा लेप रोज चेहऱ्यावर लावावा आणि थोडय़ा वेळाने पाण्याने चेहरा धुवावा.
* १ चमचा आंबट दही घ्यावे. संत्र्याची साले वाटून त्याची अर्धा चमचा पेस्ट करून घ्यावी. दही आणि संत्र्याच्या सालांची ही पेस्ट एकत्र करावी. या मिश्रणाने चेहऱ्यावर गोलाकार मालिश करावी. १५-२० मिनिटे चेहरा तसाच राहू द्यावा आणि नंतर साध्या पाण्याने चेहरा धुवावा.
घामोळे
* अंगाला लावण्याची नेहमीची पावडर चार चमचे घ्यावी. त्यात एक चमचा चंदन पावडर, एक चमचा वाळ्याचे चूर्ण आणि अर्धा चमचा कडुनिंबाची पावडर घालावी. हे पावडरींचे मिश्रण घामोळ्यावर लावण्यासाठी वापरावे.
* ताडगोळे मिक्सरवर वाटून घ्यावे. घामोळ्यावर त्याचा पातळ थर मलमाप्रमाणे लावावा. यामुळे घामोळ्याची आग व लाली कमी होते.
* घामोळ्याचा त्रास टाळण्यासाठी उन्हाळ्यात अधूनमधून शहाळ्याचे पाणी पिणे, ताडगोळे खाणे, बडीशेप खाणे याचाही फायदा होतो.
उन्हाळ्यामुळे येणारे फोड
* हळद, चंदन आणि रक्तचंदन समप्रमाणात घेऊन त्याचा नवीन फोडांवर लेप द्यावा.
* पोटातून गुलकंद, आवळापाक, आमसुलाचे सरबत इ. अवश्य घ्यावे.
गोवर, कांजिण्यांचे पुरळ किंवा फोड
* बीट पाण्यात उकळावे. हे पाणी गाळून गार झाल्यावर बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवावे. गोवर व कांजिण्यांच्या पुरळ वा फोडांवर हे पाणी मलमाप्रमाणे ब्रशने १-१ तासाने लावावे. पुरळाच्या जागी होणारी आग व खाज कमी होण्यास यामुळे मदत होईल.
* धने व जिरे दोन्ही १-१ चमचा घ्यावे. त्याचा एक कप पाण्यात काढा तयार करून तो थोडी खडीसाखर घालून प्यावा.
* गोवर- कांजिण्यांवर लवकर आराम पडण्यासाठी आमसुलाचे सरबत तयार करून ते दिवसभर थोडे-थोडे पीत रहावे.
उन्हापासून त्वचेला जपण्यासाठी
* उन्हातून आल्यावर काकडीचा रस चेहरा आणि हातांवर चोळावा.
* काकडी, कलिंगड, लिची, ऊस या गोष्टी उन्हाळ्यात जरूर खाव्यात. आहारात काळे मीठ आणि जिऱ्याचा वापर अवश्य करावा. या पदार्थामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते तसेच लघवी व शौचाला साफ होते.
* प्रखर उन्हापासून त्वचेचे संरक्षण व्हावे यासाठी या दिवसांत अंग झाकणारे कपडे घालावेत. सनकोट अवश्य वापरावा.
– डॉ. संजीवनी राजवाडे,
संग्रहित लेख, दिनांक 6th May 2014 रोजी प्रकाशित
उन्हाळ्यात त्वचा सांभाळा!
कडक ऊन आणि प्रचंड घाम अशा परिस्थितीत त्वचेच्या तक्रारी ठरलेल्याच.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 06-05-2014 at 06:46 IST
मराठीतील सर्व Health इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Take care of skin in summer season