तुमची साखरेची आवड ही तुमच्या ह्रदयाला हानिकारक ठरू शकते. खूप साखर खाण्याने ह्रदयविकाराचा झटका येऊ शकतो, असा दावा एका नवीन संशोधनात केला आहे. ग्लुकोज मेटॅबोलाइट ग्लुकोज ६ फॉस्फेट या एका लहान रेणूमुळे ह्रदयावर ताण येतो. या रेणूमुळे ह्रदयाच्या स्नायूतील प्रथिनांच्या रचनेत काही बदल होतात व त्याची रक्त पंप करण्याची शक्ती कमी होते. त्यामुळे ह्रदयविकाराचा झटका येतो असे टेक्सास विद्यापीठाच्या आरोग्य विज्ञान केंद्राच्या संशोधकांनी म्हटले आहे. जी ६ पी हा रेणू खूप स्टार्च किंवा साखर सेवनाने साठत जातो. अनेकदा डॉक्टर यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांवर द्रव नियंत्रित करणारी डाययुरेटिक औषधे व बिटा ब्लॉकर औषधे देत असतात. काहीवेळा एसीइ इनहीबिटर्सचाही वापर ह्रदयावरील ताण कमी करण्यासाठी केला जातो असे हेनरिच टँगमेयर यांनी सांगितले. उच्च रक्तदाबामुळे ह्रदयाच्या स्नायूंवर अगोदरच ताण असतो व नंतर जादा ग्लुकोजमुळे त्यात भरच पडते. आताच्या संशोधनामुळे नवीन औषधे ह्रदयविकाराला आटोक्यात ठेवण्यासाठी तयार करता येणार आहेत. रॅम्पामायसिन (इम्युनोसप्रेसंट) व मेटफॉरमिन (मधुमेहावरील औषध) यामुळे जी ६ पी चे संदेश विस्कळित केले जातात व त्यामुळे त्याचा दुष्परिणाम होत नाही व ह्रदयाची शक्तीही वाढते, असे त्यांचे म्हणणे आहे. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.