वैज्ञानिकांनी डेंग्यू विषाणूची क्षमता कमकुवत करणारी एक उपाययोजना तयार केली असून त्यातून या प्राणहानीकारक विषाणूवर नवीन लस तयार करणे शक्य होणार आहे. जगातील लोकसंख्येतील निम्म्या लोकांना डेंग्यूची लागण होण्याचा धोका असतो व दरवर्षी ४० कोटी लोकांना डेंग्यूची प्रत्यक्ष लागण होते. त्यामुळे या रोगावर प्रदीर्घ काळ परिणामकारकता दाखवणारी सामायिक लस तयार करणे गरजेचे आहे.अ‍ॅस्टरच्या सिंगापूर इम्युनॉलॉजी नेटवर्कमध्ये या विषाणूला मारण्यासाठी एक नवीन वैद्यकीय दिशा सापडली आहे त्यानुसार या विषाणूची यजमान व्यक्तीच्या प्रतिकारशक्ती प्रणालीत लपवण्याची क्षमता नष्ट करता येऊ शकेल. डेंग्यूच्या विषाणूला एमटेस या वितंचकाची गरज असते. त्याच्या मदतीने तो त्याचे जनुकीय घटक रासायनिकदृष्टय़ा अशा पद्धतीने बदलतो ज्यामुळे त्याचा शोध घेणे अवघड जाते. त्यामुळे या विषाणूत हे एमटेज वितंचकाला निष्प्रभ करण्याच्या वेगळे जनुकीय परिवर्तन घडवून आणले जाते. त्यामुळे प्रतिकारशक्ती प्रणालीचा योग्य तो प्रतिसाद मिळतो, परिणामी हा विषाणू परिणाम करू शकत नाही. एमटेज वितंचक कमकुवत केलेल्या विषाणूच्या मदतीने केलेल्या प्रयोगात असे दिसले की, अशा पद्धतीचा विषाणू एडिस डासांमध्येच टिकाव धरू शकत नाही तसेच तो या डासांमध्ये आपल्या आवृत्त्या तयार करू शकत नाही. पर्यायाने डास चावल्याने त्याचा प्रसार माणसात होऊ शकत नाही. त्यामुळे एमटेज उत्परिवर्तित डेंग्यू विषाणू हा लस तयार करण्यास सुरक्षित आहे व त्याच्यापासून डेंग्यूच्या विषाणूचे एकूण जे चार प्रकार आहेत त्यांच्यापासून संरक्षण मिळू शकते. सध्यातरी डेंग्यूवर वैद्यकीयदृष्टय़ा मान्यताप्राप्त अशी लस उपलब्ध नाही. सिंगापूरच्या नोवार्तिस इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल डिसीजेस व बीजिंग इन्स्टिटय़ूट ऑफ मायक्रोबायॉलॉजी अँड एपिडिमिऑलॉजी या संस्थांच्या सहकार्याने हे प्रयोग करण्यात आले असून आता लस तयार करण्याचे अंतिम काम बाकी आहे असे डॉ. काटजा फिंक यांनी सांगितले.
डिमेन्शिया विकारावर नवीन चाचणी विकसित
डिमेन्शिया हा एक  विकार आहे. त्याचे नंतर निदान होऊन फार वेळ झालेला असतो. स्मृती नष्ट होत जाऊन त्याची ही पुढची पायरी असते, परंतु त्याचे वेळीच निदान करण्यासाठी एक चाचणी शोधण्यात आली असून तिला ‘आइनस्टाइन चाचणी’ असे नाव देण्यात आले आहे. या साध्याशा चाचणीत अल्बर्ट आइनस्टाइन, बिल गेट्स किंवा ऑपरा विनफ्रे यांसारख्या व्यक्तींची चित्रे ओळखणे किंवा त्यांची नावे लक्षात ठेवणे यांसारख्या तंत्राने ४० ते ६५ वयोगटातील व्यक्तींमधील हा आजार ओळखता येतो. संबंधित व्यक्तीचे छायाचित्र ओळखणे व नाव सांगणे या चाचणीत अपेक्षित आहे. त्यामुळे आकलनात्मक क्षमतेत काही बिघाड झाला असेल किंवा होत असेल, तर तो लगेच कळतो असा दावा शिकागो येथील नॉर्थवेस्ट युनिव्हर्सिटी फेनबर्ग स्कूल ऑफ मेडिसिन या संस्थेचे प्रा. तमार गेफेन यांनी केला आहे. त्यांनी एमिली रोगॉलस्की यांच्या समवेत नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीत हे संशोधन केले आहे. प्राथमिक वाचाभंग झालेले ३० लोक व विसराळूपणा नसलेले २७ लोक अशा साधारण सरासरी ६२ वयोगटातील लोकांसाठी ही चाचणी वापरण्यात आली. वैज्ञानिकांनी या चाचणीत जो प्रयोग केला त्यात असे दिसून आले की, ज्या लोकांना डिमेन्शिया जडण्याची चिन्हे होती. त्यांच्यापैकी ७९ टक्के लोकांनी हे प्रसिद्ध व्यक्तींचे चेहरे ओळखले व ४६ टक्के व्यक्तींनी नावही सांगितले. ज्यांना विसराळूपणा होण्याची शक्यता नव्हती त्यांच्यापैकी ९७ टक्के लोकांनी चेहरे ओळखले व ९३ टक्के लोकांनी त्यांचे नावही सांगितले.
पार्किन्सनमधील आणखी जनुकीय उत्परिवर्तने सापडली
पार्किन्सन म्हणजे कंपवात या रोगास कारण ठरणारी जनुकीय उत्परिवर्तने शोधण्यात आली आहेत. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन व  केंब्रिज विद्यापीठ व शेफील्ड विद्यापीठ यांच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार पार्किन्सनचा एफबीएक्सओ ७ हा जनुक मिटॅफॅगी या प्रक्रियेवर परिणाम करतो. हानी झालेल्या पेशींच्या धोक्यातून शरीराला वाचवण्याची मिटॅफॅगी ही एक जैविक प्रक्रिया आहे. मायटोकाँड्रिया हे पेशींचे ऊर्जाकेंद्र असते व मेंदूतील चेतापेशी ऊर्जेसाठी त्यावर अवलंबून असतात. जे मायटोकाँड्रिया खराब झालेले असतात ते हानिकारक असतात. पेशी असे खराब मायटोकाँड्रिया खाऊन टाकतात या प्रक्रियेला मिटॅफॅगी असे म्हटले जाते. यापूर्वी पिंक १ व पार्किन ही दोन जनुके या प्रक्रियेत भूमिका पार पाडत असल्याचे दिसून आले होते. नव्या अभ्यासानुसार एफबीएक्सओ ७ या जनुकातील उत्परिवर्तनही पार्किन्सनशी संबंधित आहे. या उत्परिवर्तनामुळे मिटॅफॅगी प्रक्रियेत दोष निर्माण होतात त्यामुळे पार्किन्सनमध्ये मेंदूच्या पेशी मरतात. त्यामुळे या प्रक्रियेशी निगडित उपचारपद्धती वापरणे योग्य ठरेल असे मत यूसीएल इन्स्टिटय़ूट ऑफ न्यूरॉलॉजीच्या हेलन प्लन-फॅवऱ्यू यांनी म्हटले आहे. नेचर न्यूरोसायन्स या नियतकालिकात हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे.
स्मार्टफोनमुळे निकटदृष्टीतेचा धोका
स्मार्टफोनमुळे साधारण सात वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये निकटदृष्टीतेचा विकार (जवळचे कमी दिसणे) बळावतो असा इशारा ब्रिटनच्या नेत्रशल्यविशारदांनी दिला आहे. १९९७ मध्ये स्मार्टफोन वापरात आल्यानंतर निकटदृष्टीतेच्या रुग्णांची संख्या ३५ टक्क्य़ांनी वाढली असल्याचा दावा लेसर शल्य विशारद डेव्हिड अलांबी यांनी दिला आहे. अलांबी हे फोकस क्लिनिकचे संस्थापक असून प्रौढ व मुलांमध्ये निकटदृष्टीतेचा विकार हा येत्या दहा वर्षांत ५० टक्क्य़ांनी वाढणार आहे. त्यांच्या मते हा स्मार्टफोनच्या पडद्याकडे पाहण्याने एक नवीनच स्क्रीन साइटेडनेस हा नवीन आजार बळावतो. संशोधनात असे दिसून आले की, जे लोक हँडसेट त्यांच्यापासून १८ ते ३० से.मी. इतक्या अंतरावर धरतात. वृत्तपत्रे किंवा पुस्तकेही वाचताना चेहऱ्यापासून ४० से.मी. अंतरावर धरायची असतात, त्यामुळे स्मार्टफोन इतका जवळ धरल्याने निकटदृष्टीता हा आजार बळावतो. यावर लोकांनी स्मार्टफोनच्या स्क्रीनकडे किती वेळ पाहायचे याला मर्यादा घालून घ्यायला हवी. सूर्यप्रकाशित वातावरणात जर आपण फिरायला बाहेर पडलो तर निकटदृष्टीता कमी होतो. मुलांना कुठल्या वयात स्मार्टफोन वापरायला द्यावा याचाही विचार केला पाहिजे. अ‍ॅलम्बी यांनी असे सांगितले की, मुलांची आजची पिढी ही निकटदृष्टीतेची शिकार झाली आहे. सध्याच्या काळात वयाच्या सातव्या वर्षी मुलांच्या हातात पहिला स्मार्टफोन पडतो हे घातक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा