निरोगी महिलेच्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण १२.१ ते १५.१ ग्रॅमदरम्यान (ग्रॅम पर डेसिलिटर ब्लड) असणे अपेक्षित असते. पुरुषांसाठी हे प्रमाण १३.८ ते १७.२ ग्रॅमदरम्यान असायला हवे असे सांगितले जाते. महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण आठ ते दहा ग्रॅम या दरम्यान असले तर त्या अवस्थेला सौम्य अ‍ॅनिमिया म्हणजेच सौम्य रक्तक्षय असे म्हटले जाते. यात थोडय़ा कामानेही थकवा येणे, कामातील दम (स्टॅमिना) कमी होणे असे त्रास संभवतात. या तुलनेत हे प्रमाण गरोदर नसलेल्या महिलांमध्ये दहा ते बारा ग्रॅमदरम्यान असले तरी त्यांच्या रोजच्या जीवनावर त्याचा फारसा परिणाम होत नाही. हिमोग्लोबिन आठ ग्रॅमच्या खाली गेले तर मात्र तो तीव्र रक्तक्षय समजला जातो. वाईट बाब म्हणजे रक्तक्षयाचे प्रमाण मुली आणि स्त्रियांमध्ये खूप मोठे आहे.
आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी योग्य आहे का, हे जाणून घेण्यासाठी आपल्या फॅमिली डॉक्टरांना विचारून महिलांनी ठराविक काळाने हिमोग्लोबिनची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. याद्वारे रक्तक्षय असल्यास त्यावर वेळीच उपाय करणे शक्य होईल.       
अ‍ॅनिमिया होऊच नये यासाठी
* हिरव्या भाज्या खाव्यात. पालक, मेथी, लेटय़ूस म्हणजे सॅलडची पाने, हिरवा फ्लॉवर (ब्रोकोली) अशा भाज्यांचा शक्य झाल्यास जेवणात अवश्य समावेश करावा.
* बीटाची लोह देणारी कोशिंबीरही आहारात अधूनमधून असावी.  अधुनमधून नाचणीची भाकरी किंवा नाचणी सत्त्वही घेता येईल.
* लोह असलेली फळे खावीत. डाळिंब, संत्रं, चिकू, स्ट्रॉबेरी अशी फळे जरूर खावीत.
* मनुका, खजूर, जर्दाळू, बदाम असा सुकामेवाही योग्य प्रमाणात खाण्यात असावा.
* जेवणाबरोबर चहा- कॉफी नको. जेवल्यानंतर २-४ तास चहा-कॉफी प्यायचे टाळावेच.