सणासुदीचे दिवस सुरू झाले आहेत. गोकुळाष्टमी नुकतीच झाली. आता वेध लागले आहेत गणेशोत्सवाचे.अनेक ठिकाणी मोठमोठय़ा आवाजात गाणी लावणे, ढोल-ताशे बडवणे, विसर्जन मिरवणुकीत बेंजोचा दणदणाट करणे, फटाके फोडणे, असे प्रकार सर्रास होतील.  वयोवृद्ध, लहान मुले, आजारी माणसे यांना त्या दणदणाटामुळे खूप त्रास होत असतो. त्यांनी आणि खरे तर इतरांनीही या आवाजाच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार करायला हवी.

पोलिसांच्या हेल्पलाइनचा क्रमांक माहीत आहेच – १००. या क्रमांकाशिवाय आणखी एक क्रमांक आहे – १०९०. यापैकी कोणत्याही क्रमांकावर दिवसाच्या कोणत्याही वेळी आवाजाच्या प्रदूषणाविषयी तक्रार नोंदवता येते. तक्रार नोंदवणाऱ्या व्यक्तीला आपले नाव सांगण्याची किंवा ओळख देण्याची गरज नसते. मात्र, तक्रार नोंदवल्यावर त्यासाठीचा नोंदणी क्रमांक आठवणीने मागायचा, कारण तक्रारीच्या पाठपुराव्यासाठी त्या क्रमांकाची गरज असते.

एस.एम.एस. करूनही आपण पोलिसांकडे आवाजाच्या प्रदूषणाविषयी तक्रार नोंदवू शकतो. त्यासाठीचे क्रमांक आहेत- ७७३८१३३१३३ किंवा ७७३८१४४१४४. यापैकी कोणत्याही क्रमांकावर आपण तक्रार नोंदवू शकतो. या प्रकाराने तक्रार नोंदवल्यास आपल्याकडे त्याचा पुरावा राहातो. तक्रार नोंदवल्यावर १०-१५ मिनिटांमध्ये पोलीस आपल्याला उलटा दूरध्वनी करून तक्रारीची खात्री करून घेतात. त्यानंतर लगेचच कार्यवाही होते.

मात्र, या कोणत्याही प्रकाराने तक्रारी करताना माहिती व्यवस्थित द्यायला हवी. म्हणजे ध्वनिप्रदूषणाचे ठिकाण, त्याची तीव्रता, प्रकार, कारण, शक्य असल्यास संबंधित व्यक्तींची अथवा संस्था, मंडळ किंवा संघटनेची नावे, ध्वनिप्रदूषणाचा कालावधी, त्याचा होत असलेला परिणाम म्हणजे वृद्धांना, मुलांना, आजारी व्यक्तींना कसा त्रास होत आहे, खिडक्यांच्या काचा हादरत आहेत किंवा अन्य माहिती व्यवस्थित द्यायला हवी. त्यामुळे कारवाई करणे सोयीचे जाईल.

 

शुभांगी पुणतांबेकर

puntambekar.shubhangi@gmail.com

Story img Loader