पाचशे आणि एक हजार रुपयाच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा पंतप्रधानांनी केल्यानंतर सुरू झालेला गोंधळ अद्याप पूर्णपणे निस्तरलेला नाही. जुन्या नोटांचे ‘रद्दीकरण’ आणि नवीन नोटांचा तुटवडा यामुळे गेल्या आठवडय़ात देशभर झालेल्या गोंधळाच्या पाश्र्वभूमीवर खरेदी-विक्रीच्या व्यवहारांसाठी कागदी चलनातील पर्यायांवर आता चर्चा होऊ लागली आहे. तसे पाहता मोठय़ा रकमेच्या रोख व्यवहारांना धनादेश, डिमांड ड्राफ्ट हे पर्याय फार आधीपासून अस्तित्वात आहेत. त्यात आता इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग या पर्यायांची भर पडली आहे. या माध्यमांतून कितीही मोठय़ा रकमेचे व्यवहार अतिशय सुरक्षितपणे आणि जलद करता येतात. शिवाय एकमेकांपासून कितीही लांब असणाऱ्या व्यक्तीला काही मिनिटांत रक्कम पाठवण्यासाठी इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंग उपयोगी पडत आहे. असे असले तरी छोटय़ा व्यवहारांना, विशेषत: बाजारातील किरकोळ खरेदीसाठी आजही कागदी नोटांचाच वापर होत आहे; परंतु हे व्यवहारही आता मोबाइलवरून करणे शक्य झाले आहे. वाण्याकडून खरेदी केलेल्या शंभरहून कमी रुपयांच्या सामानाचे पैसेही तुम्हाला चुकवता येतील, अशी व्यवस्था असलेले अनेक अॅप्स सध्या स्मार्टफोनवर उपलब्ध आहेत. पेटीएम, फ्रीचार्ज, सायट्रस, ट्रमनी यांसारखे अनेक ‘वॉलेट’ अॅप तुम्हाला अँड्रॉइड किंवा अॅपल स्टोअरवर मिळतील. बाजारात अनेक दुकानांमध्ये असे ‘वॉलेट मनी’ स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यातल्या त्यात ‘पेटीएम’ हे अॅप आता बहुतांश ठिकाणी काम करते. या अॅप्सच्या माध्यमातून तुम्ही खिशात नोटा किंवा सुटे पैसे नसतानाही सामानाची खरेदी करू शकता. याशिवाय विविध प्रकारच्या देयकांचा भरणाही या अॅपच्या माध्यमातून करता येतो.
ऑनलाइन रिचार्ज, बिल भरणा यांसह खरेदीकरिता वापरता येणारे पेटीएम हे अॅप देशातील प्रमुख महानगरांमध्ये कार्यान्वित आहे. या अॅपवरून तुम्ही कोणत्याही मोबाइल सेवा कंपनीची बिले भरू शकता. याशिवाय ‘डायरेक्ट टू होम’ अर्थात टाटा स्काय, रिलायन्स, व्हिडीओकॉन, डिश टीव्ही अशा टीटीएच सेवांचे रिचार्जही पेटीएमच्या माध्यमातून करता येतात. याशिवाय वीज, दूरध्वनी, इंधन, मेट्रोची तिकिटेही या अॅपच्या माध्यमातून खरेदी करता येतात. अलीकडेच खासगी टॅक्सी सेवा तसेच रिक्षांसाठीही पेटीएमच्या माध्यमातून भाडे देता येते. अनेक स्थानिक दुकानांत पेटीएमने पैसे भरण्याची मुभा देण्यात आली आहे. विम्याचे हप्ते भरणे, सिनेमाची तिकिटे, रेल्वे आरक्षण या गोष्टीही पेटीएमच्या माध्यमातून करता येतात. ज्या दुकानांत तुम्हाला पेटीएमचे स्टिकर दिसेल, तेथे तुम्हाला अशी खरेदी करता येईल. या अॅपमध्ये ‘स्कॅन अॅण्ड पे’ अशी सुविधा पुरवण्यात आली आहे. त्या सुविधेनुसार तुम्ही संबंधित दुकानाचा कोड आपल्या पेटीएम अॅपमध्ये स्कॅन करून त्याचे बिल भरू शकता.
‘पेटीएम’प्रमाणेच काम करणारे अनेक ‘वॉलेट’ अॅप तुम्हाला अॅप्सच्या बाजारात मिळतील.
प्रत्येक अॅपमध्ये जवळपास सारख्याच सुविधा असतात. मात्र, त्यातही तुम्ही ज्या दुकानांतून खरेदी करता, त्या दुकानांमध्ये कोणत्या प्रकारच्या अॅपच्या माध्यमातून खरेदीची सुविधा देण्यात आली आहे, हे तपासून तुम्ही ते अॅप वापरू शकता. याखेरीज विविध बँकांच्या अॅपमध्येही अशी सुविधा पुरवण्यात येत आहेत. त्याचाही तुम्ही वापर करू शकता.
असिफ बागवान
asif.bagwan@expressindia.com