समाजाला वेगळ्या प्रकारे साहाय्यभूत ठरणाऱ्या, म्हणजेच एका अर्थाने हेल्पलाइन ठरणाऱ्या संस्थांची माहिती आपण करून घेत आहोत. खऱ्या अर्थाने समाजाला आवश्यक असणारे काम करणाऱ्या अशा संस्थांची माहिती आपल्याला असायलाच हवी. आज आणखी काही अशाच संस्थांविषयी जाणून घेऊ या.

आर. के. चॅरिटेबल ट्रस्ट नावाची एक सेवाभावी कार्य करणारी संस्था आहे. रुग्णांसाठी आवश्यक असलेली काही वैद्यकीय उपकरणे, तसेच साहित्य या संस्थेतर्फे वापरण्यासाठी विनामूल्य पुरवले जाते. त्यासाठी काही रक्कम ठेव म्हणून घेतली जाते. पण वस्तू परत केल्यावर रक्कम परत केली जाते. चाकांची खुर्ची, सक्शन मशीन, वॉटर बेड, एअर बेड, वॉकर असे साहित्य घरी वापरण्यासाठी दिले जाते. संपर्कासाठी कार्यकर्त्यांची नावे आणि दूरध्वनी क्रमांक – संजय शहा – ९३२२५१६६२८, चिंतन पंडय़ा – ७६६६३११९४२. पत्ता – १७-डी, निसर्ग अपार्टमेंट, आय.डी.बी.आय. बँकेशेजारी, महावीर नगर, कांदिवली(प.), मुंबई ४०००६७.

दक्षिण मुंबईतील जसलोक, सैफी, बॉम्बे, नायर आणि जे.जे. या रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना, तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाइकांना जेवणाचे डबे विनामूल्य पुरवण्याचे काम करणारे काही कार्यकर्ते आहेत. त्यांची नावे आणि संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक – कल्पेश लोढा – ९९६७२३६००६, मनोज पटवारी – ९८२०६४५०७०, अमरत जैन – ९०२९३७३७५१.

‘रिलिफ इंडिया ट्रस्ट’ या स्वयंसेवी संस्थेतर्फे थॅलसेमियाग्रस्त गरीब रुग्णांना मदत केली जाते. या विकाराबाबत जनजागृती करण्याचे कामही या संस्थेतर्फे केले जाते. रुग्णांना मार्गदर्शन करण्याबरोबरच त्यांना चांगल्या रुग्णालयात उपचार मिळावेत म्हणून प्रयत्न केले जातात. थॅलसेमिया झालेल्या गरीब रुग्णांसाठी मोफत रक्ताचा पुरवठाही या संस्थेतर्फे केला जातो. संस्थेतर्फे रक्तदान शिबिरेसुद्धा भरवली जातात. संपर्कासाठी विनामूल्य दूरध्वनी क्रमांक – ०१२० ४२५८३१३, १८००१०३१७७७.

सीम्स फॉर ड्रीम्स – वापरलेले, नको असलेले, पण चांगल्या स्थितीतले कपडे गोळा करून मुंबईतील ही संस्था वंचितांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांना देते किंवा निधी जमवण्यासाठी हे गोळा केलेले कपडे ‘गराज सेल’मध्ये विकले जातात. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक – ६१४६४०२०.

 

शुभांगी पुणतांबेकर

puntambekar.shubhangi@gmail.com

Story img Loader