Ajinkya Rahane Becomes First Indian To Lead Three Teams In IPL: भारताचा मधल्या फळीतील फलंदाज अजिंक्य रहाणे गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय संघातून बाहेर आहे. असे असले तरी त्याने गेल्या काही काळात झालेल्या देशांतर्गत स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. अशात आजपासून सुरू झालेल्या आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेने रायल चॅलेजर्स बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात मैदानावर पाऊल ठेवताच खास विक्रम रचला आहे. तो आयपीएलमधील तीन संघांचं कर्णधारपद भूषविणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
दरम्यान रहाणेचा कर्णधार म्हणून आयपीएलमधील हा २६ वा सामना आहे. यापूर्वी त्याने आयपीएल २०१७ च्या एका सामन्यात पुणे सुपर जायन्ट्स कर्णधार म्हणून भूमिका पार पाडली होती. तर, २०१८ आणि २०१९ च्या आयपीएलमधील २४ सामन्यांमध्ये तो राजस्थान रॉयल्सचा कर्णधार होता.
कुमार संगकारा
यापूर्वी श्रीलंकेचे महेला जयवर्धने व कुमार संगकारा आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ या तीन खेळाडूंनी आयपीएलमध्ये तीन संघांचे कर्णधारपद भूषवले आहे. संगकाराने २०१० च्या हंगामात १३ सामन्यांमध्ये पंजाब किंग्ज, २५ सामन्यांमध्ये डेक्कन चार्जर्स आणि २०१३ च्या हंगामात नऊ सामन्यांमध्ये सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्व केले होते.
स्टीव्ह स्मिथ
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने आयपीएल २०१२ मध्ये पुणे वॉरियर्स इंडियाचे एका सामन्यात, रायझिंग पुणे सुपर जायंट्सचे १५ सामन्यात आणि राजस्थान रॉयल्सचे २७ सामन्यात नेतृत्व केले होते.
महेला जयवर्धने
दुसरीकडे, श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि सध्या मुंबई इंडियन्सचा प्रशिक्षक असलेल्या महेला जयवर्धनेने आयपीएल २०१० मध्ये पंजाब किंग्जचे एका सामन्यात, २०११ मध्ये कोची टस्कर्स केरळचे १३ सामन्यात आणि दिल्ली कॅपिटल्सचे २०१२ आणि २०१३ मध्ये १६ सामन्यात नेतृत्व केले होते.
गेल्या दोन वर्षांत रहाणेची दमदार कामगिरी
अजिंक्य रहाणे गेल्या दोन वर्षांपासून त्याच्या फलंदाजीमुळे चर्चेत आहे. रहाणेने २०२३ पासून आयपीएलमध्ये २३ डावांमध्ये १४८ च्या स्ट्राईक रेटने ५६८ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये आघाडीच्या फळीत खेळणाऱ्या रहाणेने पॉवरप्लेमध्ये १५५ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. रहाणेचा हा स्ट्राइक रेट २०२३ पासून आयपीएलमध्ये किमान २५० धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये तिसरा सर्वोत्तम आहे. रहाणे याआधीही कोलकाताकडून खेळला आहे. २०२२ मध्ये त्याने ७ डावात १३३ धावा केल्या होत्या.
दरम्यान अजिंक्य रहाणेने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेचे दमदार कामगिरी केली होती. रहाणेने या स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने ८ डावांमध्ये ५८.६ च्या सरासरीने आणि १६५ च्या स्ट्राईक रेटने ४६९ धावा केल्या होत्या. या यादीत बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदार दुसऱ्या स्थानावर होता, त्याने ९ डावांमध्ये ६१.१ च्या सरासरीने आणि १८६ च्या स्ट्राईक रेटने ४२८ धावा केल्या होत्या.