Indian Premier League 2025 ला दिमाखात सुरुवात झाली आहे. पहिल्याच सामन्यात विराट कोहलीच्या टीमने विजय मिळवला आहे. तर आज मुंबईचा सामना रंगतो आहे. मात्र आयपीएल स्पर्धेला वादाची किनारही लाभली आहे. पाच मोठे वाद कुठले आपण आज या बातमीतून जाणून घेऊ.

२००८ च्या आयपीएल स्पर्धेत पहिला मोठा वाद

२००८ च्या आयपीएल स्पर्धेत सर्वात मोठा वाद पहिल्यांदा घडला होता. मुंबई इंडियनचा कॅप्टन हरभजन सिंगने किंग इलेव्हन पंजाबमध्ये असलेल्या गोलंदाज श्रीशांतच्या श्रीमुखात भडकवली होती. पंजाबच्या संघाने त्या सामन्यात मुंबईच्या संघाचा ६६ धावांना पराभव केला होता. त्यावेळी एकीकडे सेलिब्रेशन होत होतं तर दुसरीकडे भज्जीने श्रीशांतच्या कानाखाली वाजवली होती. समोर आलेल्या माहितीनुसार श्रीशांतने भज्जीला चिडवलं होतं. त्यानंतर भज्जीचा राग अनावर झाला आणि त्याने श्रीशांतला कानाखाली लगावली होती. त्यामुळे हरभजन सिंगला त्या सिझनमधून निलंबित करण्यात आलं होतं.

२०१२ चा शाहरुख खान वानखेडे स्टेडियमवरील गार्डचा वाद

आयपीएलमध्ये २०१२ मध्ये घडलेला शाहरुख खान आणि सुरक्षा रक्षकाचा वाद आजही लोकांच्या स्मरणात आहे. कोलकाता नाईट रायडर्स या शाहरुखच्या संघाने वानखेडे स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या मुंबई इंडियन बरोबरच्या सामन्यात मुंबईचा पराभव केला होता. १६ मे २०१२ हा तो दिवस होता. त्यानंतर विजयाचं सेलिब्रेशन सुरु असतानाच अभिनेता शाहरुख खान आणि वानखेडे स्टेडियमचा सुरक्षा रक्षक यांच्यात बाचाबाची झाली होती. सुरक्षा रक्षकाने मला आणि माझ्या मुलीला (सुहाना खान) यांना योग्य वर्तणूक दिली नाही त्यामुळे चिडलो होतो असं स्पष्टीकरण शाहरुखने दिलं होतं. मात्र शाहरुख खानचा राग अनावर झाला होता हे सगळ्यांनीच पाहिलं. तसंच या प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रारही झाली होती. यानंतर शाहरुखला २०१५ पर्यंत वानखेडेवर येण्यास बंदी घालण्यात आली होती.

२०१३ मधे काय वाद झाला होता?

२०१३ च्या आयपीएल मध्ये विराट कोहली आणि लखनऊचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हक यांच्यातील मैदानावर वाद झाला होता. ज्यामध्ये सामन्यानंतर गौतम गंभीर देखील सामील होता, हा वाद आयपीएल इतिहासातील सर्वात मोठ्या वादांपैकी एक मानला जातो. लखनऊच्या एकना स्टेडियमवर आरसीबी आणि एलएसजी यांच्यातील सामन्यादरम्यान ही घटना घडली. या सामन्यात विराट कोहलीने नवीन उल हकला अपशब्द वापरले होते. यानंतर सामना संपल्यानंतरही विराट वाद घालताना दिसला, ज्यानंतर एलएसजीचा मार्गदर्शक गौतम गंभीरने आपल्या खेळाडूंचा समर्थनार्थ हस्तक्षेप केला. यानंतर गंभीर आणि विराट यांच्यात मोठा वाद झाला, त्यामुळे तिघांनाही दंड ठोठावण्यात आला. या वादानंतर विराट आणि गंभीर या दोघांमध्ये दहा वर्षे हा वाद धुमसत राहिला. पण अखेर दोघांनीही या वादावर २०२३ मध्ये पडदा टाकला.

२०१३ मध्ये स्पॉट फिक्सिंगमुळे आयपीएल काळवंडलं

२०१३ मध्ये स्पॉट फिक्सिंगमुळे आयपीएल काळवंडलं. या सगळ्याला सुरुवात झाली ती सुनील भाटिया या बुकीच्या अटकेमुळे. या प्रकरणात विंदू दारा सिंगचंही नाव समोर आलं. तसंच श्रीशांतअजित चंदिला, अंकित चव्हाण यांचीही नावं समोर आली. हा वाद आयपीएलच्या इतिहासातीला काळा अध्याय म्हणून ओळखला जातो. यामुळे बीसीसीआयचे प्रेसिडंट एन. श्रीनिवासन यांना त्यांचं पद सोडावं लागलं होतं. तसंच या संदर्भात लोढा समितीची स्थापना करण्यात आली होती. ज्यांनी सीएसके आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांवर बंदी घातली होती. त्यानंतर गुजरात लॉयन्स आणि पुणे सुपर जाएंट हे दोन संघ निर्माण झाले होते. त्यानंतर पु्ण्याचा संघ स्पॉन्सर्स नसल्याने पुढे आला नाही.

२०१९ ला धोनीमुळे काय वाद झाला ?

२०१९ मध्ये आयपीएलच्या सामन्यात सीएसकेची फलंदाजी सुरु होती. राजस्थान रॉयल्सचा बॉलर बेन स्टोक्सने जो बॉल टाकला तो उंचीच्या कारणामुळे नो बॉल दिला. CSK ला जिंकण्यासाठी ३ बॉलमध्ये आठ रन हवे असताना हा नो बॉल देणं सीएसकेसाठी फायद्याचं होतं. पण दुसऱ्या अंपायरने तो बॉल नो बॉल नाही असं म्हटलं. त्यामुळे धोनी प्रचंड चिडला आणि त्याने मैदानावर धावत येत अंपायरशी हुज्जत घातली. हा नो बॉल का नाही हे तो विचारु लागला आणि वाद घालू लागला. या सगळ्या गदारोळानंतरही सीएसकेने चार गडी राखून हा सामना जिंकला. पण एम. एस. धोनीला आयपीएलच्या कोड ऑफ कंडक्टचं उल्लंघन केल्यामुळे त्याला मिळालेल्या मानधनाच्या ५० टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागली.