‘दुनिया हिला देंगे’ म्हणत मुंबई इंडियन्सने काल बलाढ्य चेन्नई सुपरकिंग्जला धूळ चारली. अगदी रडत-खडत प्लेऑफमध्ये दाखल झालेल्या मुंबईने क्वालिफायर खेळीत चेन्नईवर केलेली मात म्हणजे केटी लागलेल्या विद्यार्थ्याने परिक्षेत टॉप करावे अशी असली तरी वानखेडेवरील मुंबईचा विजय हा त्यांच्या स्वप्नवत कामगिरीचा नजराणा होता. यस.. ‘भज्जी टर्न द गेम’… पंजाब सुपूत्र हरभजन सिंगने मोक्याच्या क्षणी पाठोपाठ घेतलेली रैना आणि धोनीची विकेट सामन्याचा टर्निंग पॉईंट होता. भज्जीच्या गोलंदाजीतील व्हेरिएशन्सने मन खूष झाले. अकराव्या षटकात रैनाच्या ऑफलेंथवर ठेवून काढलेला पहिला डॉट आणि त्यानंतरचा मिडल लेंथवरील चेंडू रैनाला झेल देण्यास उद्युक्त करणारा ठरला. पुढच्याच चेंडूवर धोनीची विकेट तर लाजवाबच होती. या मोसमाच्या सुरूवातीला मात्र संघाचा मुख्य फिरकीपटू असलेल्या हरभजनकडून साजेशी कामगिरी होताना दिसत नव्हती. फलंदाजाने मारलेल्या चौकार आणि षटकारानंतर दबावाखाली टाकलेले पुढचे काही चेंडू असेच काहीसे हरभजनचे रुप सुरूवातीच्या सामन्यांत पाहायला मिळाले होते. मात्र, क्वालिफायर सामन्यात धोनीची विकेट घेतल्यानंतरच्या जल्लोषात खरा हरभजन पाहायला मिळाला. हरभजनने घेतलेल्या या दोन विकेट्सनंतर सहकारी गोलंदाजांसह संघातील सर्व खेळाडूंमध्ये विजयी हुरूप निर्माण झालेला दिसला. हरभजनचे संघात हुरूप आणून देणारे हेच गुण आजवर मुंबई इंडियन्सला नवी उर्जा मिळवून देणारे ठरले. पंजाब विरुद्धच्या सामन्यात १७७ धावांचा पाठलाग करताना मुंबईच्या ताफ्यातील सर्व फलंदाज धारातीर्थी पडले असताना हरभजनने २५ चेंडूत केलेली ६४ धावांची आतषबाजी खेळी विसरून चालणार नाही. या सामन्यात मुंबईच्या पदरात निराशा पडली होती. मात्र, हरभजनच्या खेळीने पराभवाची जागा समाधानाने घेतली होती. हरभजन आजवर मुंबई इंडियन्स संघातील खेळाडूंमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा एक महत्त्वाचा दुवा राहिला आहे ही गोष्ट मान्य करावीच लागेल. अंतिम सामन्यात देखील भज्जीकडून अशीच चांगल्या कामगिरीची अपेक्षा मुंबईच्या चाहत्यांना असेल. मात्र, वेळोवेळी भज्जीने मुंबई इंडियन्सला दिलेल्या योगदानाबद्दल, ‘भज्जी तुस्सी छा गये’ असेच म्हणावे लागेल.

– मोरेश्वर येरम
moreshwar.yeram@expressindia.com