साधारण दीड महिन्यापूर्वी सुरु झालेल्या आयपीएल अर्थात इंडियन प्रिमीयर लीगची रंगत पहिल्या दिवसापासून ते अगदी शेवटच्या दिवसापर्यंत पाहायला मिळाली. क्रिकेटच्या या महाकुंभात भारतातील क्रिकेटपटूंसोबतच विविध देशातील खेळाडूंचाही अफलातून खेळ पाहायला मिळाला. आयपीएलच्या यंदाच्या हंगामाचा अंतिम सामनाही खऱ्या अर्थाने चुरशीचा ठरला. दाक्षिणात्य संघांमध्येच असणारं हे द्वंद्व पहिल्यांदाच पाहायला मिळालं, ज्यामध्ये फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण यासोबतच चाहत्यांचा ओसंडून वाहणारा उत्साह या सर्व गोष्टींचा सुरेख नमुना पाहता आला. चेन्नई सुपरकिंग्ज आणि सनरायजर्स हैदराबाद या संघांमध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात धोनीच्या नेतृत्त्वाखाली मैदानात उतरलेल्या चेन्नईच्या संघाने बाजी मारली.
चेन्नईच्या संघाने हैदराबादवर आठ गडी राखून विजय मिळवला. ज्यानंतर मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आणि सर्वत्रच चेन्नईच्या संघाला पाठिंबा देणाऱ्यांला एकच कल्ला पाहायला मिळाला. आयपीएलच्या ११ व्या हंगामाचं जेतेपद मिळणाऱ्या संघाच्या वाट्याला बरीच बक्षीसंही आली. मुख्य म्हणजे या संघाला विजेतेपदासाठी मिळालेली रक्कम सध्या क्रीडाविश्वात चर्चेचा विषय ठरत आहे.
धोनीच्या चेन्नई ब्रिगेडला विजेतेपदासाठी तब्बल वीस कोटींची बक्षीसपात्र रक्कम देण्यात आली आहे. तर उपविजेत्या हैदराबादच्या संघाला १२ कोटी ५० लाख रुपये इतकी रक्कम देण्यात आली आहे. आयपीएलमध्ये खेळाडूंवर लावल्या जाणाऱ्या बोलीसोबतच आता विजेतेपदाची ही रक्कमीही अनेकांनाच थक्क करुन जात आहे.
CHAMPIONS!! pic.twitter.com/ieYmc4aQTO
— IndianPremierLeague (@IPL) May 27, 2018
वाचा : चेन्नई विरुद्ध हैदराबाद अंतिम सामन्यात झालेले हे ५ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का?
दरम्यान, चेन्नई आणि हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएल २०१८ च्या अंतिम सामन्यात बऱ्याच गोष्टी चर्चेचा विषय ठरल्या. चेन्नईच्या संघातून फलंदाजीसाठी आलेल्या शेन वॉटसनने धमाकेदार फटकेबाजी करत ५७ चेंडूंमध्ये ११७ धावा केल्या. या खेळीसाठी त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं. यंदाच्या आयपीएलमध्ये १६ सामन्यांत ७५३ धावा करणाऱ्या सनरायजर्स हैदराबादच्या कर्णधारपदी असणाऱ्या केन विलियमसन याला ऑरेंज कॅप तर, किंग्ज इलेव्हन पंजाबच्या अँड्र्यू टॉयला पर्पल कॅपने गौरवण्यात आलं. ऑरेंज आणि पर्पल कॅप विजेत्यांना बक्षीसस्वरुपात प्रत्येकी १० लाख रुपये मिळाले असल्याचं कळत आहे.