कावेरीच्या पाणीवाटपावरुन निर्माण झालेल्या तिढ्यावर सध्या तामिळनाडूचं राजकारण चांगलचं तापलेलं आहे. मात्र या तापलेल्या राजकारणाचा फटका आयपीएलच्या सामन्यांना बसण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. अनेक तामिळ आणि द्रविडी राजकारणी संघटनांनी चेन्नईत आयपीएलचे सामने खेळवण्यास आपला तीव्र विरोध दर्शवला आहे. कावेरी पाणीवाटपाचा पेच सोडवण्यासाठी जोपर्यंत स्वतंत्र लवादाची स्थापना होत नाही, तोपर्यंत आपला आयपीएलला असणारा विरोध कायम राहणार असल्याचं द्रविडी राजकारणी संघटनांनी स्पष्ट केलं आहे.

“कावेरी पाणीवाटपाच्या मुद्द्यावर तामिळनाडूवर मोठा अन्याय करण्यात आला आहे. याचा निषेध करण्यासाठी आयपीएलचे चेन्नईतले सामने रद्द करण्यात यावेत अशी आमची मागणी आहे. आमच्याविरोधानंतरही राज्य सरकार आणि पोलिसांनी आयपीएल सामन्यांना संरक्षण देण्याचा निर्णय घेतला तर आम्ही रस्त्यावर येऊन आपला विरोध दर्शवणार आहोत.” स्थानिक तामिळ संघटनेचे नेते पनुरुती वेलुमुरगन यांनी आयपीएलच्या सामन्यांना आपला विरोध दर्शवला.

कावेरीच्या पाणीवाटपावरुन सध्या तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यांमध्ये वाद सुरु आहे. १६ फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटकच्या पारड्यात आपलं दान टाकत, कावेरीच्या पाण्याचा जास्तीचा वाटा कर्नाटकला बहाल केला. या निर्णयामुळे सध्या तामिळनाडूत चांगलाच असंतोष पसरलेला आहे. प्रमुख विरोधी पक्ष डीएमके, तसेच नव्याने राजकारणात प्रवेश केलेल्या कमल हसन यांनीही सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर आपली नाराजी व्यक्त केली. ५ एप्रिलरोजी तामिळनाडूत न्यायालयाच्या निर्णयाविरोधात बंदही पुकारण्यात आलेला होता.

अनेक तामिळ संघटना आणि प्रसारमाध्यमं कावेरी पाणीवाटपावरुन आयपीएलच्या सामन्यांना विरोध करत सोशल मीडियावरुन सामान्य लोकांची मत मागवत आहेत.

आजपासून आयपीएलच्या अकराव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. मात्र चेन्नईत सुरु असलेला विरोध पाहता, महेंद्रसिंह धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज संघ आपल्या घरच्या मैदानावर आयपीएलचे सामने खेळू शकतो की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.