भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर टीका आणि त्यामुळे बीसीसीआयची ओढवून घेतलेली नाराजी माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांना चांगलीच भोवताना दिसत आहे. आयपीएलच्या आगामी हंगामासाठी कॉमेंट्री पॅनलमध्ये संजय मांजरेकर यांना BCCI ने स्थान दिलेलं नाही. बीसीसीआयने ७ जणांच्या कॉमेंट्री पॅनलची घोषणा केली आहे. ज्यात माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर, लक्ष्मण शिवरामकृष्णन, मुरली कार्तिक, दीप दासगुप्ता, रोहन गावस्कर, हर्षा भोगले आणि अंजुम चोप्रा यांना स्थान देण्यात आलं आहे. ‘मुंबई मिरर’ने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता समालोचकांनाही युएईत Bio Security Bubble चे नियम पाळावे लागणार आहेत. सात समालोचकांची ३ गटांमध्ये विभागणी होणार आहे. दीप दासगुप्ता आणि मुरली कार्तिक यांच्याकडे अबुधाबी यांच्यातील सामन्यांची जबाबदारी असणार आहे तर उर्वरित समालोचक दुबई आणि शारजा येथील सामन्यांची जबाबदारी पार पडतील. भारतीय समालोचकांसोबत काही परदेशी समालोचकही यंदाच्या आयपीएलमध्ये असणार आहेत.

अवश्य वाचा – टी-२० आहे, कसोटी क्रिकेट नाही…मोठे फटके खेळ !

मार्च महिन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेदरम्यान मांजरेकर यांना बीसीसीआयने डच्चू दिला होता. बीसीसीआयचे अधिकारी मांजरेकर यांच्यावर नाराज असल्याचं समोर आलं होतं. यानंतर काही दिवसांपूर्वी संजय मांजरेकर यांनी बीसीसीआयला पत्र लिहून मला आयपीएलमध्ये समालोचनाची संधी द्यावी अशी विनंतीही केली होती. परंतू बीसीसीआयने त्यांच्या विनंतीचा विचार केलेला दिसत नाही.