महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाचं आयपीएलच्या तेराव्या हंगामातलं आव्हान संपुष्टात आलं आहे. रैना-हरभजन यांनी स्पर्धेआधी घेतलेली माघार, यानंतर खेळाडूंना झालेल्या दुखापती, चुकीची संघनिवड या सर्व गोष्टींमध्ये चेन्नईचा संघ यंदा उभारीच घेऊ शकला नाही. साखळी फेरीतूनच बाहेर पडण्याची चेन्नईच्या संघावर पहिल्यांदाच वेळ आली आहे. असं असलं तरीही पुढील हंगामात आपण खेळत राहणार असल्याचं धोनीने स्पष्ट केलंय. परंतू पुढील वर्षासाठी श्रीलंकेचा माजी यष्टीरक्षक आणि दिग्गज फलंदाज कुमार संगकाराने धोनीला महत्वाचा सल्ला दिला आहे.

“यंदा धोनी स्वतः ज्या पद्धतीने खेळला त्याबद्दल निराश असेल. पण आता या मुद्द्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. यंदा काय चुकलं यावर चेन्नईचा संघ घरी जाऊन विचार करु शकतो. पण धोनीला आता पुढच्या काही महिन्यांमध्ये काही स्पर्धांमध्ये खेळावच लागेल. आयपीएलच्या दोन हंगामांमध्ये आता फारसा वेळ नाहीये. अशावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली असताना टी-२० लिग किंवा स्थानिक स्पर्धांमध्ये न खेळणं धोनीला महागात पडू शकतं. फॉर्मात येण्यासाठी त्याला काही स्पर्धांमध्ये खेळावच लागेल.” Star Sports वाहिनीवर समालोचनादरम्यान संगकाराने आपलं मत मांडलं.

पंजाबविरुद्ध आपला अखरेचा साखळी सामना खेळत असताना नाणेफेकीसाठी अँकरिंग करत असलेल्या डॅनी मॉरिसन यांनी धोनीला यलो जर्सीवर हा तुझा शेवटचा सामना आहे का?? असा प्रश्न विचारला…ज्याला उत्तर देताना धोनीने नक्कीच नाही असं सांगितलं. त्यामुळे आगामी हंगामातही धोनी चेन्नईकडून खेळणार असल्याचं स्पष्ट झालंय.