राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जला पराभवाचा सामना करावा लागला. २१७ धावांचं आव्हान पार करताना चेन्नईचा संघ २०० धावांपर्यंतच मजल मारु शकला. या सामन्यात धोनी फलंदाजीसाठी सातव्या क्रमांकावर आल्यामुळे त्याच्यावर चांगलीच टीका होत आहे. गौतम गंभीर, विरेंद्र सेहवाग, केविन पिटरसन यासारख्या माजी खेळाडूंनीह त्याला उशीरा फलंदाजीसाठी येण्यावरुन टीकेचं धनी बनवलं. गंभीरने तर थेट २१७ धावांचं आव्हान पार करताना सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येणं याला नेतृत्व करणं म्हणत नाही. संघाला गरज असताना तू पुढे येऊन लढणं गरजेचं आहे, अशा शब्दांत गंभीरने धोनीवर टीका केली.

भारतीय संघाचा माजी खेळाडू आकाश चोप्राने याप्रकरणी आपलं वेगळ मत मांडलं आहे. “धोनी हा कधीही स्वतःला प्रमोट करत नाही, त्याने नेहमी संघातील तरुण आणि गुणवान खेळाडूंना पाठींबा दिला आहे. याच पद्धतीने त्याने सर्वात यशस्वी कर्णधार हा मान मिळवलाय. ज्यावेळी धोनीबद्दल काही विषय असेल त्यावेळी गंभीर बोलताना मागेपुढे पाहत नाही. राजस्थानविरुद्ध सामन्यात चेन्नईने व्यवस्थित झुंझ दिली. कोणाला हे मत पटणार नाही. गंभीरचं याबाबती वेगळं मत आहे, त्यावरही चर्चा होऊ शकते. माझ्यामते धोनीची शैली ही इतर कर्णधारांपेक्षा वेगळी आहे. स्वतःला प्रमोट करण्यापेक्षा तो संघातील इतरांना संधी देऊन एक भक्कम संघ उभारतो.” ESPNCricinfo संकेतस्थळासाठी लिहीलेल्या लेखात आकाश चोप्राने आपलं मत मांडलं.

मुंबईविरुद्धच्या सामन्यात अंबाती रायुडूने फटकेबाजी केल्यामुळे धोनीने उशीरा फलंदाजीसाठी येणं कोणालाही खटकलं नाही. परंतू राजस्थानविरुद्धच्या सामन्यात २०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान समोर असताना धोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आल्याने त्याला टीकेचा धनी व्हायला लागलं. आज चेन्नई सुपरकिंग्जसमोर दिल्ली कॅपिटल्सचं आव्हान असणार आहे. अशा परिस्थितीत धोनी आणि चेन्नईचा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.