आयपीएलच्या तेराव्या हंगामात आतापर्यंत भारताच्या युवा खेळाडूंनी आपली चमक दाखवली आहे. राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा संजू सॅमसन या सर्वांमध्ये भाव खाऊन गेला आहे. आतापर्यंत तेराव्या हंगामात संजूने दोन धडाकेबाज अर्धशतकी खेळींची नोंद केली आहे. सोशल मीडियावर तर चाहत्यांनी आतापासून भारतीय संघात आता ऋषभ पंत ऐवजी संजू सॅमसनला संधी देण्याची मागणी करायला सुरुवात केली आहे. अनेक माजी खेळाडूंनी संजूला अद्याप भारतीय संघात संधी कशी मिळाली नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केलंय. मात्र राजस्थान रॉयल्स संघाचा मेंटॉर शेन वॉर्न संजूबद्दल समाधानी आहे.

“मला आशा आहे की संजू यंदा त्याच्या कामगिरीत सातत्य राखेल. जर तो यंदाच्या आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण खेळत राहिला तर तो लवकरच भारताकडून तिन्ही प्रकारच्या क्रिकेट सामन्यांमध्ये खेळताना दिसेल.” पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत वॉर्न बोलत होता. संजू खूप गुणवान खेळाडू आहे. मी माझ्या कारकिर्दीत अनेक प्रतिभावान खेळाडूंना पाहिलं आहे. पण गेल्या काही वर्षांपासून मी संजूला ओळखतोय, तो नेट्समध्ये फलंदाजी करताना त्याला पाहतोय, त्याला मार्गदर्शन करतोय. त्याच्यात खूप प्रतिभा असल्याचं मला नेहमी जाणवतं, वॉर्नने संजूचं कौतुक केलं.

आयपीएलच्या तेराव्या हंगामात संजूने केलेल्या दोन अर्धशतकी खेळीनंतर अनेकांनी त्याची तुलना धोनीशी केली. विशेषकरुन ऋषभ पंत वारंवार मिळालेल्या संधीचं सोनं करण्यात अपयशी ठरत असताना संजूला आता भारतीय संघात स्थान मिळायला हवं अशी मागणी चाहते करत आहेत.