आयपीएलच्या तेराव्या हंगामात ऐतिहासीक शारजाच्या मैदानावर पहिला सामना खेळणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाला राजस्थानच्या वादळी खेळीचा फटका बसला. संजू सॅमसन, स्टिव्ह स्मिथ आणि अखेरच्या षटकांत जोफ्रा आर्चर यांनी केलेल्या चौफेर फटकेबाजीमुळे राजस्थानने सामन्यात २१६ धावांपर्यंत मजल मारली. दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज लुन्गिसानी एन्गिडीने टाकलेलं अखेरचं षटक चेन्नईला चांगलंच महागात पडलं. मात्र या षटकामध्ये चार षटकार लगावणाऱ्या जोफ्रा आर्चरचे जुने ट्विट पुन्हा व्हायरल झालं आहे.

९ जानेवारी २०१५ रोजी आर्चरने केलेलं हे ट्विट असून यामध्ये केवळ ६६६६ असं लिहिण्यात आलेलं आहे. अनेक भारतीय क्रिकेट चाहते आता या साडेपाच वर्षांहून अधिक जुन्या ट्विटला रिप्लाय करत आहेत.

इतकचं नाही तर २०१५ सालीच आर्चरने केलेलं चेन्नईसंदर्भातील अन्य एक ट्विटही चर्चेत आलं आहे. या ट्विटमध्ये सीएसकेला अडचणींचा समाना करावा लागेल असं आर्चर म्हणाला आहे.

याचबरोबर शेवटच्या षटकामध्ये ३० धावा निघाल्याने आर्चरने २०१४ साली केलेले एका षटकात ३० धावा असं सांगणारं ट्विटही व्हायरल झालं आहे.

तर या षटकामध्ये दोन अनपेक्षित नो बॉल टाकल्याने दोन षटकार मारल्यावर १४ धावा मिळाल्याचा संदर्भ जोडत आर्चरचे अनपेक्षित भेट हे ट्विटही व्हायरल झालं आहे.

क्रिकेट चाहत्यांच्या आर्चरच्या या ट्विटवरील काही प्रतिक्रिया

१) तू तुझे ट्विट कधीच डिलीट करु नकोस

२) हा योगायोग नाही का?

३) त्याला कसं माहित होतं?

४) त्याला सगळं ठाऊक असतं

५) त्याला कसं कळलं

६) पाच वर्षांपूर्वीच बोलेला

७)हाच खरा भविष्य सांगणारा

इंग्लंडचा नवोदित गोलंदाज जोफ्रा आर्चरने आजच्या सामन्यात आठ चेंडूंमध्ये चार षटकारांच्या मदतीने २७ धावा केल्या. आर्चर हा  त्याच्या मैदानावरील खेळाबरोबरच ट्विटसाठीही लोकप्रिय आहे. अनेकदा एखादी मोठी घटना घडल्यानंतर त्याने केलेले जुने ट्विट व्हायरल होत असतात. त्याचे काही भारतीय चाहते तर मजेत ‘आर्चर ही भगवान है’ असंही म्हणतात. आपल्या ट्विटमुळे अनेकदा चर्चेत असणाऱ्या आर्चर पुन्हा नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.