आयपीएलच्या तेराव्या हंगामाला अखेरीस युएईत सुरुवात झाली आहे. अबु धाबीच्या मैदानावर गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामन्याला सुरुवात झाली. तब्बल ४ महिन्यांपेक्षा जास्त काळाने भारतीय खेळाडू मैदानावर उतरत असल्यामुळे सर्व क्रिकेटप्रेमींसाठी हा आनंदाचा क्षण होता. चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

चेन्नईकडून करोनावर मात केलेल्या दीपक चहरने गोलंदाजीला सुरुवात केली. दीपक चहरच्या पहिल्याच चेंडूवर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने खणखणीत चौकार खेचत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. रोहितचा हा चौकार एका अर्थाने विक्रमी ठरला. आयपीएलच्या आतापर्यंतच्या १२ हंगामांपैकी एकदाही पहिल्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर चौकार किंवा षटकार लगावण्यात आलेला नाही. रोहितने तब्बल १२ हंगामानंतर हा विक्रम करत दणक्यात सुरुवात केली.

मुंबईने पहिल्या सामन्यासाठी ट्रेंट बोल्टसह जेम्स पॅटिन्सनला संघात स्थान दिली. फलंदाजीदरम्यान क्विंटन डी-कॉकनेही रोहितला चांगली साथ देत फटकेबाजी केली. मात्र दुर्दैवाने रोहित मोठी खेळी करु शकला नाही. पियुष चावलाने १२ धावांवर रोहितला माघारी धाडलं.