आयपीएलच्या तेराव्या हंगामाची सुरुवात चेन्नई सुपरकिंग्जने दणक्यात विजय साजरा करत केली. पहिल्याच सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर चेन्नईने ५ गडी राखून मात केली. मुंबईने विजयासाठी दिलेलं १६३ धावांचं आव्हान चेन्नईने अंबाती रायुडू आणि फाफ डु-प्लेसिस यांच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर पूर्ण केलं. अंबाती रायुडूने ७१ तर डु-प्लेसिसने नाबाद ५८ धावा केल्या. रायुडू आणि डु-प्लेसिस जोडीने शतकी भागीदारी करत चेन्नईच्या विजयाची पायाभरणी केली.

राहुल चहरने अंबाती रायुडूला बाद करत चेन्नईची जोडी फोडली. रायुडू माघारी परतल्यानंतर धोनी मैदानात येईल अशी अनेकांना अपेक्षा होती. परंतू धोनीने आपल्याआधी रविंद्र जाडेजा आणि सॅम करन यांना संधी देत स्वतः मागे थांबणं पसंत केलं. अनेक माजी खेळाडू आणि चाहत्यांनीही सोशल मीडियावर धोनी फलंदाजीला कधी येणार?? तसेच धोनी का येत नाहीये?? असे प्रश्न विचारायला सुरुवात केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अखेरीस सॅम करन माघारी परतल्यानंतर धोनी मैदानात आला. महत्वाची गोष्ट म्हणजे शून्यावर असताना धोनी झेलबाद असल्याचं मुंबईचं अपील पंचांनी उचलून धरलं. परंतू तिसऱ्या पंचांच्या पाहणीत धोनी नाबाद असल्याचं स्पष्ट झालं आणि त्याला जीवदान दिलं. यानंतर धोनी विजयी फटका खेळून संघाला विजय मिळवून देईल अशी अनेक चाहत्यांची अपेक्षा होती. परंतू धोनीने एकही धाव न काढता डु-प्लेसिसला विजयी फटका खेळण्याची संधी दिली. धोनी ० धावांवर नाबाद राहिला.