विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाची आयपीएलच्या तेराव्या हंगामातली स्वप्नवत कामगिरी सुरुच आहे. अबु धाबीच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सामन्यात RCB च्या गोलंदाजांनी धडाकेबाज कामगिरी केली आहे. कोलकात्याचा कर्णधार मॉर्गनने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतू RCB च्या गोलंदाजांनी भेदक मारा करत KKR च्या आघाडीच्या फळीतल्या गोलंदाजांना दणके दिले.

या सर्वांमध्ये उठून दिसला तो मोहम्मद सिराज. सुरुवातीच्या स्पेलमधली दोन षटकं निर्धाव टाकत ३ बळी घेण्याचा विक्रम मोहम्मद सिराजने आपल्या नावावर केला. आयपीएलच्या सामन्यात दोन मेडन ओव्हर टाकणारा सिराज पहिलाच गोलंदाज ठरला आहे.

राहुल त्रिपाठी, नितीश राणा आणि टॉम बँटन या फलंदाजांना सिराजने माघारी धाडलं. RCB च्या या भेदक माऱ्यासमोर कोलकाता नाईट रायडर्सचे फलंदाज पुरते भांबावलेले दिसले. नवदीप सैनीनेही शुबमन गिलला माघारी धाडत KKR च्या अडचणींमध्ये आणखी भर टाकली.