गेल्या काही दिवसांपासून जगभरातील चाहते ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण अखेरीस आला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या धोनीने सनराईजर्स हैदराबादविरुद्ध सामन्यात आपली जबाबदारी ओळखत लवकर फलंदाजीला येत आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केला. सलामीच्या फलंदाजांची हाराकिरी, मोक्याच्या क्षणी जाडेजासोबत तुटलेली भागीदारी आणि दुबईतलं उष्ण हवामान या सर्वांचा सामना करत धोनीने चांगली फटकेबाजी केली. परंतू संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला.

हैदराबादविरुद्ध सामन्यात धोनीने ३६ चेंडूत ४ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ४७ धावा केल्या. अखेरच्या षटकांत धोनीने दोन-दोन धावा घेत गोलंदाजांवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान उष्ण हवामानामुळे धोनीला दमही लागला. यानंतर वैद्यकीय उपचार आणि थोडावेळ श्वास घेत धोनीने पुन्हा एकदा संघाला विजय मिळवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. अखेरच्या षटकांत चेन्नईला विजयासाठी २८ धावांची गरज होती. परंतू युवा अब्दुल समदने आश्वासक गोलंदाजी करत हैदराबादला सात धावांनी मात केली.

दरम्यान, तेराव्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्जच्या पराभवाची ही हॅटट्रीक ठरली आहे. सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला हरवल्यानंतर चेन्नईला राजस्थान, दिल्ली आणि हैदराबाद या तीन संघाकडून पराभव पत्करावा लागला आहे. आघाडीच्या फळीतल्या फलंदाजांनी केलेली हाराकिरी चेन्नईच्या पराभवाला कारणीभूत ठरली आहे. हैदराबादच्या गोलंदाजांनी या सामन्यात टिच्चून मारा करत चेन्नईच्या फलंदाजांना संधीच दिली नाही.