भरवशाच्या फलंदाजांनी मोक्याच्या क्षणी केलेला निराशाजनक खेळ राजस्थान रॉयल्सला चांगलाच महागात पडला आहे. स्पर्धेत आव्हान टिकवण्यासाठी विजय आवश्यक असलेल्या सामन्यात राजस्थानला कोलकाता नाईट रायडर्सकडून ६० धावांनी पराभव स्विकारावा लागला. राजस्थानचा संघ १३१ धावांपर्यंतच मजल मारु शकला. या पराभवासोबत राजस्थानचं आयपीएलच्या तेराव्या हंगामातलं आव्हान संपुष्टात आलं आहे. १९२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थानची पहिल्यापासून खराब सुरुवात झाली. पॅट कमिन्स आणि इतर गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यापुढे राजस्थानच्या सर्व फलंदाजांनी नांगी टाकली. मधल्या फळीत जोस बटलर आणि राहुल तेवतिया यांनी काही क्षणांसाठी भागीदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतू त्यांचे प्रयत्नही अपुरे पडले. राजस्थानकडून बटलरने ३५ तर तेवतियाने ३१ धावांची खेळी केली. KKR कडून पॅट कमिन्सने ४, वरुण चक्रवर्ती आणि शिवम मवीने प्रत्येकी २-२ तर कमलेश नागरकोटी १ बळी घेतला.

त्याआधी, कर्णधार ओएन मॉर्गनचं नाबाद अर्धशतक आणि त्याला इतर फलंदाजांनी दिलेली साथ या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने महत्वाच्या सामन्यात १९१ धावांपर्यंत मजल मारली. सामन्यात पहिल्यांदा गोलंदाजी करताना राजस्थानच्या संघाने आश्वासक मारा केला. परंतू संघ संकटात सापडलेला असताना कर्णधार मॉर्गन आणि आंद्रे रसेलने फटकेबाजी करत राजस्थानसमोर मोठं आव्हान निर्माण केलं. मॉर्गनने नाबाद ६८ धावांची खेळी केली. त्याच्या अर्धशतकी खेळीत ५ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या राजस्थानने दणक्यात सुरुवात केली. जोफ्रा आर्चरने गेल्या काही सामन्यांपासून आपला धडाकेबाज फॉर्म कायम ठेवत नितीश राणाला पहिल्याच षटकात माघारी धाडलं. यानंतर शुबमन गिल आणि राहुल त्रिपाठी या फलंदाजांनी संयमी खेळ करत कोलकाता नाईट रायडर्सचा डाव सावरला. राजस्थानच्या गोलंदाजांचा सामना करत दोन्ही फलंदाजांनी धावांचा ओघ कायम ठेवला. दुसऱ्या विकेटसाठी ७२ धावा जोडल्यानंतर गिल राहुल तेवतियाच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने ३६ धावांची खेळी केली. यानंतर चौथ्या क्रमांकावर बढती देण्यात आलेला सुनिल नारायणही भोपळा न फोडता माघारी परतला. राहुल तेवतियाच्या गोलंदाजीवर बेन स्टोक्सने त्याचा झेल घेतला. राहुल त्रिपाठीही ठराविक अंतराने माघारी परतल्यामुळे चांगली सुरुवात करुनही मोक्याच्या क्षणी KKR चा संघ अडचणीत सापडला.

भरीस भर म्हणून दिनेश कार्तिकही तेवतियाच्या गोलंदाजीवर स्टिव्ह स्मिथकडे सोपा झेल देऊन माघारी परतला. दिनेश कार्तिकलाही शून्यावर माघारी परतावं लागलं. यानंतर मैदानावर आलेल्या कर्णधार मॉर्गन आणि आंद्रे रसेल यांनी फटकेबाजी करत संघाला आश्वासक धावसंख्येचा टप्पा ओलांडून दिला. प्रदीर्घ कालावधीने संधी मिळालेल्या स्टोक्सने ११ चेंडूत १ चौकार आणि ३ षटकार लगावत २५ धावा केल्या. फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात कार्तिक त्यागीच्या गोलंदाजीवर रसेल माघारी परतला. परंतू कर्णधार मॉर्गनने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत महत्वाच्या सामन्यांत संघाला भक्कम धावसंख्या उभारुन दिली. राजस्थानकडून राहुल तेवतियाने ३, कार्तिक त्यागीने २ तर जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाळ यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.