आयपीएलच्या तेराव्या हंगामात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघासमोर पहिल्याच सामन्यात डेव्हिड वॉर्नरच्या सनराईजर्स हैदराबादचं आव्हान आहे. दुबईच्या मैदानात नाणेफेक जिंकून हैदराबादने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यंदा RCB च्या संघात काही नवीन खेळाडू आल्यामुळे हा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. सलामीच्या जोडीसाठी RCB ने देवदत्त पडीकल आणि ऑस्ट्रेलियन कर्णधार अ‍ॅरोन फिंचला संधी दिली.

या निमीत्ताने RCB चा संघ हा आयपीएलच्या इतिहासात सलामीच्या जोडीसाठी सर्वाधिक प्रयोग करणारा संघ ठरला आहे. पडीकल आणि फिंच च्या रुपाने RCB ची आयपीएलच्या इतिहासातली ही ५९ वी सलामीची जोडी होती.

स्थानिक स्पर्धेत खेळत असताना पडीकलने केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे त्याला यंदा RCB मध्ये स्थान देण्यात आलं आहे. तर गेल्या काही सामन्यात फिंचच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाच्या संघानेही चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे येणाऱ्या सामन्यांमध्ये RCB आपल्या याच जोडीवर विश्वास दाखवतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.