आयपीएलच्या तेराव्या हंगामात प्ले-ऑफच्या शर्यतीमधून बाहेर फेकल्या गेलेल्या चेन्नई सुपरकिंग्जला अखेरच्या काही सामन्यांमध्ये आपल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं सापडली आहे. महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडने साखळी फेरीत आपला अखेरचा सामना खेळताना पंजाबविरुद्ध सामन्यात धडाकेबाज अर्धशतकी खेळी केली. पंजाबने विजयासाठी दिलेल्या १५४ धावांचा पाठलाग करताना ऋतुराजने फाफ डु-प्लेसिससोबत महत्वपूर्ण भागीदारी केली. डु-प्लेसिस माघारी परतल्यानंतर ऋतुराजने पुन्हा एकदा रायुडूसोबत डाव सावरत अर्धशतक झळकावलं. ऋतुराजने ४९ चेंडूत ६२ धावांची खेळी केली.
पंजाबविरुद्ध सामन्यात अर्धशतक झळकावल्यानंतर ऋतुराज चेन्नईकडून सलग तीन सामन्यांत अर्धशतक झळकावणारा पहिला खेळाडू ठरला आहे. RCB, KKR आणि पंजाब अशा तीन संघांविरोधात ऋतुराजने अर्धशतक झळकावत स्वतःचा फॉर्म सिद्ध केला आहे.
Ruturaj Gaikwad
1st CSK player to score 3 consecutive 50+ scores in IPL
vs RCB, KKR, KXIP#CSKvKXIP
— ComeOn Cricket IPL2020 (@ComeOnCricket) November 1, 2020
आयपीएलचा तेरावा हंगाम ऋतुराजसाठी नक्कीच सोपा नव्हता. सुरेश रैनाच्या अनुपस्थितीत ऋतुराजकडे तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून पाहण्यात आलं. परंतू सलामीच्या सामन्याआधीच ऋतुराजला करोनाची लागण झाल्यामुळे तो सुरुवातीचे काही सामने खेळू शकला नाही. ज्या सामन्यांत ऋतुराजला संधी मिळाली तिकडे त्याला मधल्या फळीत संधी मिळाली. दुर्दैवाने ऋतुराज या सामन्यांत अपयशी ठरला. पहिल्या ३ सामन्यांमध्ये दोनवेळा शून्यावर बाद होऊन एका सामन्यात ५ धावा करणाऱ्या ऋतुराजने नंतरच्या ३ सामन्यांमध्ये अर्धशतकी खेळी करत स्वतःला सिद्ध केलं आहे.