गतविजेत्या मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या तेराव्या हंगामात अंतिम सामना खेळताना नेहमीप्रमाणे आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केला आहे. दिल्ली कॅपिटल्सला १५६ धावांवर रोखल्यानंतर मुंबईकडून कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डी-कॉकने आश्वासक सुरुवात केली. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी केल्यानंतर सूर्यकुमार यादव मैदानात आला.

सूर्यकुमारनेही आपल्या कर्णधाराला उत्तम साथ देत सामन्यावर मुंबईचं वर्चस्व कायम राहील याची काळजी घेतली. रोहित शर्मा अंतिम सामन्यात चांगल्या फॉर्मात फटकेबाजी करत होता. रविचंद्रन आश्विनच्या गोलंदाजीवर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात रोहित आणि सूर्यकुमारमध्ये गोंधळ निर्माण झाला. रोहित नॉन स्ट्राईक एंडपर्यंत पोहचल्यावर त्याची विकेट धोक्यात असल्याचं लक्षात येताच सूर्यकुमारने स्वतःच्या विकेटवर पाणी सोडत रोहितला वाचवलं. पाहा हा व्हिडीओ…

हा प्रसंग सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनीही सूर्यकुमारचं कौतुक केलंय.

१९ धावा काढून सूर्यकुमार यादव बाद झाला. यानंतर कर्णधार रोहित शर्माने फटकेबाजी करत सामन्यावर आपली पकड ढिली होणार नाही याची काळजी घेतली. रोहित शर्माही अखेरच्या षटकांत मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात ६८ धावा काढून बाद झाला. नॉर्जने त्याचा बळी घेतला.