आयपीएलच्या तेराव्या हंगामात आपलं आव्हान टिकवण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ रविवारी दुबईच्या मैदानावर उतरले. कर्णधार मॉर्गनचं नाबाद अर्धशतक आणि रसेलच्या फटकेबाजीच्या जोरावर कोलकात्याने १९१ धावांपर्यंत मजल मारली. यानंतर गोलंदाजीत पॅट कमिन्स आणि इतर खेळाडूंच्या भेदक माऱ्यासमोर राजस्थान रॉयल्सचा डाव पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला.

रॉबिन उथप्पा, बेन स्टोक्स, स्टिव्ह स्मिथ, संजू सॅमसन हे सर्व फलंदाज महत्वाच्या सामन्यात पुरते अपयशी ठरले. गेल्या दोन सामन्यांपासून फॉर्मात असलेल्या स्टोक्सकडून राजस्थानला अपेक्षा होत्या. परंतू कमिन्सच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने हवेत झेपावत एका हातात सुरेख झेल पकडत स्टोक्सला माघारी धाडलं. पाहा हा भन्नाट व्हिडीओ…

३७ धावांमध्ये राजस्थानचा निम्मा संघ माघारी परतला. यानंतर जोस बटलर आणि राहुल तेवतिया यांनी छोटेखानी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. परंतू वरुण चक्रवर्तीने बटलरला माघारी धाडत राजस्थानला आणखी बॅकफूटला ढकललं.