आयपीएलच्या तेराव्या हंगामात महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाचं आव्हान अखेरीस संपुष्टात आलं आहे. रविवारी झालेल्या सामन्यात चेन्नईने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर ८ गडी राखून विजय मिळवला. प्ले-ऑफची शर्यत रंगतदार होत असताना आपलं आव्हान कायम राखण्यासाठी चेन्नईला मुंबई विरुद्ध राजस्थान सामन्यात मुंबईने विजय मिळवणं आवश्यक होतं. परंतू बेन स्टोक्स आणि संजू सॅमसन यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर राजस्थानने मुंबईवर मात केली आणि चेन्नईचा संघ अधिकृतपणे स्पर्धेतून बाहेर फेकला गेला.

सोशल मीडियावर चेन्नईच्या चाहत्यांमध्ये निराशेचं वातावरण असलं तरीही धोनीची पत्नी साक्षीने आपल्या पतीसाठी ट्विटर अकाऊंटवर एक खास संदेश दिला आहे. हा एक खेळ आहे. हरणं कोणालाही आवडत नाही पण प्रत्येकाला जिंकताही येत नाही. तू तेव्हाही विजेता होतास आणि आजही आहेस अशा शब्दांमध्ये साक्षीने धोनीला धीर दिला आहे.

संपूर्ण हंगामात महेंद्रसिंह धोनीला फलंदाजीत सूर गवसला नाही. महत्वाच्या खेळाडूंची माघार, दुखापती यामुळे चेन्नईचा संघ स्पर्धेत उभारी घेऊच शकला नाही. त्यामुळे पुढील हंगामात धोनीचा संघ कशी तयारी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.