आयपीएलचा तेरावा हंगाम चेन्नई सुपरकिंग्ज संघासाठी आतापर्यंत चांगला गेलेला नाही. गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर मात करत स्पर्धेची धडाकेबाज सुरुवात करणाऱ्या चेन्नईला राजस्थान आणि दिल्लीकडून पराभवाचा सामना करावा लागला. सध्या चेन्नईचा संघ गुणतालिकेत तळाशी आहे. याचसोबत प्रमुख खेळाडूंची अनुपस्थितीत, संघातील खेळाडूंना झालेली दुखापत आणि धोनीचं फलंदाजीसाठी उशीरा येणं या सर्व गोष्टींमुळे चेन्नईचा संघ गेल्या काही दिवसांपासून टीकेचा धनी ठरला आहे. त्यातच संघातील खेळाडू के.एम.असीफने Bio Secure Bubble मोडल्याचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं होतं. करोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी बीसीसीआयने सर्व संघांसाठी खास सोय केली आहे. स्पर्धेला सुरुवात होण्याआधी चेन्नईच्या दोन खेळाडूंना करोनाची लागण झाल्यामुळे खेळाडू इतका बेजबाबदारपणा कसा दाखवू शकतात असा नाराजीचा सूर सोशल मीडियावर पहायला मिळत होता.

अवश्य वाचा – RR vs KKR : उथप्पाने नियम मोडला, चेंडू चमकवण्यासाठी लाळेचा वापर

परंतू चेन्नई सुपरकिंग्जचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी असिफने Bio Secure Bubble मोडल्याचं वृत्त फेटाळून लावलं आहे. “ती बातमी देताना सर्व गोष्टींची माहिती करुन घेण्यात आली होती की नाही हे मला माहिती नाही. आमचा संघ ज्या हॉटेलमध्ये थांबलाय तिकडे लॉबीमध्ये एक रिसेप्शन तयार करण्यात आलंय. संघातील खेळाडूंसाठी हॉटेलने वेगळ्या कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. असिफने नक्कीच हॉटेलमधील इतर कर्मचाऱ्याकडे गेला नव्हता. त्याच्या खोलीची चावी हरवली होती ही गोष्ट खरी आहे, पण यानंतर नवीन चावीसाठी तो लॉबीमध्ये खेळाडूंसाठी तयार करण्यात आलेल्या रिसेप्शन डेस्करवरच चौकशीसाठी गेला होता. खेळाडूंसाठी वेगळा कर्मचारी वर्ग तैनात आहे आणि काही अडचण आल्यास त्यांनाच संपर्क साधायचा ही गोष्ट त्याला माहिती आहे. योग्य माहिती न घेता वाजवीपेक्षा हे प्रकरण वाढवण्यात आलं.” विश्वनाथन यांनी ANI वृत्तसंस्थेशी बोलताना माहिती दिली.

अवश्य वाचा – Video : त्याचा विचार नको करु ! श्रीरामपूरचा झहीर आणि बीडचा दिग्वीजय जेव्हा युएईत मराठीत बोलतात

संघातील प्रत्येक खेळाडूसह सदस्याला करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची जाणीव आहे. किंबहुना मी स्वतः आतापर्यंत ज्या मजल्यावर खेळाडू राहत आहेत तिकडे गेलेलो नाही. प्रत्येक खेळाडू आपापल्यापरीने सर्व काळजी घेत आहेत आणि असिफनेही सर्व नियमांचं पालन केलं आहे, असं म्हणत विश्वनाथन यांनी संघाची बाजू मांडली आहे. दरम्यान आठवडाभराच्या विश्रांतीनंतर CSK समोर सनराईजर्स हैदराबादचं आव्हान असणार आहे. त्यामुळे या सामन्यात चेन्नईचा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.