आयपीएलच्या तेराव्या हंगामाला आजपासून सुरुवात होणार आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगेल. संध्याकाळी साडे सात वाजता अबु धाबीच्या मैदानावर या सामन्याला सुरुवात होईल. दोन्ही संघ सलामीच्या सामन्यासाठी सज्ज झालेले असून इतर संघही पूर्ण तयारीनीशी सज्ज झाले आहेत. विराट कोहलीचा RCB संघ या हंगामासाठी सज्ज झालाय. गेल्या काही हंगामात RCB ची कामगिरी फारशी चांगली राहिलेली नाही. त्यामुळे यंदा चांगली कामगिरी करण्याचं ध्येय संघासमोर आहे.

२०१८ च्या हंगामात सनराईजर्स हैदराबादविरुद्ध सामन्यात चहलच्या गोलंदाजीवर एबी डिव्हीलियर्सने सीमारेषेवर हेल्सचा भन्नाट झेल पकडला होता. कर्णधार विराट कोहलीनेही सरावादरम्यान डिव्हीलियर्सच्या या कॅचची नक्कल करण्याचा प्रयत्न केला. विराटचा हा प्रयत्न RCB ने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

तेराव्या हंगामात RCB आपला पहिला सामना २१ तारखेला सनराईजर्स हैदराबादविरुद्ध खेळणार आहे. त्यामुळे या सामन्यात RCB चा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.