आयपीएलच्या तेराव्या हंगामात लागोपाठ ३ पराभवांचा सामना करावा लागलेल्या चेन्नई सुपरकिंग्जची गाडी अखेरीस रुळावर आली आहे. पंजाबवर १० गडी राखून मात करत चेन्नईने स्पर्धेतलं आपलं आव्हान कायम राखलं आहे. सनराईजर्स हैदराबादविरुद्ध सामन्यात चेन्नईला ७ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. १६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना धोनीने अखेरच्या षटकांमध्ये केलेल्या फटकेबाजीमुळे सामन्यात रंगत निर्माण झाली. परंतू त्याचे प्रयत्न तोकडेच पडले. फलंदाजीदरम्यान उष्ण वातावरणामुळे आलेला थकवा आणि धापा टाकणारा धोनी हे चित्र सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं.
भारतीय संघाचा माजी गोलंदाज इरफान पठाणने यानंतर धोनीचं नाव न घेता, वय हे काहींसाठी फक्त आकडा तर काहींसाठी संघातून स्थान गमावण्याचं कारण असतं असं म्हणत धोनीला टोला लगावला.
Age is just a number for some and for others a reason to be dropped…
— Irfan Pathan (@IrfanPathan) October 3, 2020
यानंतर सोशल मीडियावर इरफान पठाणला धोनीच्या चाहत्यांकडून बरचं ट्रोल व्हावं लागलं. आपल्यावर होत असलेल्या टीकेलाही इरफानने तितकंच भन्नाट उत्तर दिलं आहे.
Sirf Do line mein sir ghum gaye, puri kitaab padhne par chakkar bhi aaega;) #lovingit
— Irfan Pathan (@IrfanPathan) October 5, 2020
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इरफान पठाणने अनेक सामने धोनीच्या नेतृत्वाखाली खेळले आहेत. २००७ टी-२० विश्वचषक विजेत्या संघातही इरफान पठाण होता. याव्यतिरीक्त आयपीएलमध्ये चेन्नई आणि पुणे या दोन संघांकडून खेळतानाही इरफान धोनीच्या नेतृत्वाखाली खेळला. परंतू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांपासून त्याला स्थान मिळालं नाही. निवड समितीच्या रडारवरुन बाहेर फेकला गेलेल्या इरफानने अखेरीस आपली निवृत्ती जाहीर करत समालोचन आणि प्रशिक्षणाकडे आपलं लक्ष वळवलं.