आयपीएलच्या तेराव्या हंगामाची सुरुवात चेन्नई सुपरकिंग्जने संमिश्र स्वरुपात केली आहे. सलामीच्या सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर मात केलेल्या चेन्नईला दुसऱ्याच सामन्यात राजस्थानकडून पराभवाचा सामना करावा लागला. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात धोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आल्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला. चाहत्यांनी आणि काही माजी खेळाडूंनी धोनीच्या या रणनितीवर टीकाही केली. परंतू संघाचा प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंगने धोनीची पाठराखण केली आहे.

“गेलं एक ते दीड वर्ष धोनी फारसा क्रिकेट खेळलेला नाही. प्रत्येकाला अपेक्षा आहे की धोनीने मैदानावर यावं आणि पूर्वीसारखा खेळ करावा. पण हे असं होत नाही, त्याला थोड वेळ द्यावा लागेल, हळुहळु सराव करुन लयीत आल्यानंतर त्याच्यात फरक पडेल. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात तो पहिल्यांदाच इतक्या खालच्या क्रमांकावर खेळण्यासाठी मैदानात आला. स्पर्धा जशीजशी पुढे जाईल तसा धोनीच्या खेळात फरक पडलेला आपल्याला जाणवेल.” चेन्नई सुपरकिंग्जच्या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत फ्लेमिंग बोलत होता.

मुंबईविरुद्धच्या सामन्यात अंबाती रायुडूने फटकेबाजी केल्यामुळे धोनीने उशीरा फलंदाजीसाठी येणं कोणालाही खटकलं नाही. परंतू राजस्थानविरुद्धच्या सामन्यात २०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान समोर असताना धोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आल्याने त्याला टीकेचा धनी व्हायला लागलं. आज चेन्नई सुपरकिंग्जसमोर दिल्ली कॅपिटल्सचं आव्हान असणार आहे. अशा परिस्थितीत धोनी आणि चेन्नईचा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – BLOG : समालोचकांवर ‘ट्रोल’धाड