आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी युएईत दाखल झालेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाला गेल्या काही दिवसांमध्ये अनेक अडणींचा सामना करावा लागला. सर्वात आधी चेन्नईचे दोन खेळाडू करोनाग्रस्त आढळले. यानंतर सुरेश रैना आणि हरभजन सिंह यांनी खासगी कारण देत स्पर्धेतून माघार घेतली. सुरेश रैनाच्या परिवारातील सदस्यावर पंजाबमध्ये हल्ला झाला…ज्यात त्यांना आपले प्राण गमवावे लागले. या कारणासाठी रैनाने भारतात परतणं पसंत केलं. परंतू भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू दीप दासगुप्ताच्या मते सुरेश रैना CSK मध्ये पुनरागमन करु शकतो. CSK ने अद्याप रैना आणि हरभजन यांच्या जागी कोणलाही संघात संधी दिलेली नाही.
अवश्य वाचा – IPL 2020 : धोनीने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी – सुरेश रैना
“मला असं वाटतंय की सुरेश रैना CSK मध्ये पुनरागमन करेल. क्वारंटाइनच्या नियमामुळे कदाचीत पहिले काही सामने त्याला खेळता येणार नाही. पण तो नंतर संघात पुनरागमन करेल. कदाचीत याच कारणामुळे CSK ने अद्याप रैनाच्या बदली संघात कोणत्याही खेळाडूला जागा दिलेली नाही.” दीप ESPNCricinfo शी बोलत होता. महत्वाची गोष्ट म्हणजे सुरेश रैनानेही संघात पुनरागमन करण्याची शक्यता बोलून दाखवली होती. दीप दासगुप्ताने ८ कसोटी आणि ५ वन-डे सामन्यात भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. तसेच यंदाच्या हंगामासाठी कॉमेंट्री पॅनलमध्येही त्याची निवड झाली आहे.
दरम्यान CSK संघातील करोनाग्रस्त सदस्यांचा अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर खेळाडूंनी सरावाला सुरुवात केली आहे. क्वारंटाइन कालावधी पूर्ण केल्यानंतर पहिल्यांदा खेळाडूंनी बाहेर येऊन सरावाला सुरुवात केली आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.
अवश्य वाचा – IPL 2020 : हरभजन सिंहची स्पर्धेतून माघार, CSK संघासमोरची चिंता वाढली