आयपीएलच्या तेराव्या हंगामात सलग तीन पराभवांमुळे टीकेचं धनी बनलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाने दमदार पुनरागमन केलं आहे. दुबईच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात चेन्नईने पंजाबवर १० गडी राखून मात केली. विजयासाठी आवश्यक असलेल्या १७९ धावा चेन्नईने सलामीवीर शेन वॉटसन आणि फाफ डु-प्लेसिस यांच्या जोरावर पूर्ण केल्या. दोन्ही फलंदाजांनी संपूर्ण सामन्याच वर्चस्व गाजवत पंजाबच्या गोलंदाजांना एकही यश मिळू दिलं नाही. वॉटसनने नाबाद ८३ तर डु-प्लेसिसनेही नाबाद ८७ धावांची खेळी केली. पंजाबचे गोलंदाज या सामन्यात पुरते अपयशी ठरले.
अवश्य वाचा – IPL 2020 : तब्बल ७ वर्षांनी जुळून आला योगायोग, CSK समोर पंजाब हतबल
या कामगिरीनंतर आयपीएलकडून पंजाबचं प्रतिनिधीत्व केलेला आणि नंतर संघाला मार्गदर्शन केलेल्या विरेंद्र सेहवागने पंजाबला खडे बोल सुनावले आहेत. “लोकेश राहुलने त्याच्याकडून सर्व गोष्टी चांगल्या केल्या..नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली, अर्धशतक झळकावलं. निकोलस पूरननेही त्याला चांगली साथ दिली. परंतू १८ व्या षटकात धोनीचं नेतृत्व, जाडेजाची फिल्डींग आणि शार्दुलच्या ओव्हरमध्ये सामना फिरला. १७९ ही काही छोटी धावसंख्या नव्हती. परंतू होतं असं की अनेकदा पंजाबचे गोलंदाज स्वतःच्या संघाचे शत्रू आणि समोरच्या संघाचे मित्र असल्यासारखे गोलंदाजी करतात. रविवारी ख्रिस जॉर्डनचा वाढदिवस होता आणि तोच गोलंदाजीतून समोरच्या संघाला रिटर्न गिफ्ट देता होता. बदल्यात त्याला चेन्नईच्या संघाकडून बर्थ-डे बम्स मिळत होते. चेन्नईने १० विकेट राखून सामना जिंकला आणि पंजाबचा संघ गुणतालिकेत तळातच राहिला. खरं पहायला गेलं तर त्यांच्यासाठी तिच जागा योग्य आहे.” ‘विरु की बैठक’ या आपल्या कार्यक्रमात सेहवागने पंजाबच्या कामगिरीबद्दल नाराजी व्यक्त केली.
पंजाबने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना, वॉटसन आणि डु प्लेसिस या दोघांनी तुफान फटकेबाजी केली. पंजाबकडून ख्रिस जॉर्डन ११वे षटक टाकायला आला. त्या षटकात चौकार मारत आधी शेन वॉटसनचे आपलं अर्धशतक पूर्ण केलं. जॉर्डनच्या पहिल्या दोन चेंडूवर चौकार लगावत त्याने ३१ चेंडूत अर्धशतक ठोकलं. IPLमधील हे वॉटसनचं विसावं अर्धशतक ठरलं. त्याने माजी ऑस्ट्रेलियन फलंदाज शॉन मार्शच्या विक्रमाशी बरोबरी केली. त्याच षटकात पाचव्या चेंडूवर एकेरी धाव घेत डु प्लेसिसने ३३ चेंडूत अर्धशतक ठोकलं. त्याचं हे IPLमधलं १५वं अर्धशतक ठरलं. त्याने कायरन पोलार्ड आणि मायकल हसीच्या कामगिरीशी बरोबरी साधली. या दोघांनी आपली विकेट न गमावता संघाला १७९ धावांचं लक्ष्य सहज गाठून दिलं. डु प्लेसिसने नाबाद ८७ तर वॉटसनने नाबाद ८३ धावा केल्या. चेन्नईच्या संघाची ही IPL इतिहासातील सर्वोत्तम सलामी भागीदारी ठरली.