भारतामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेत वाढणारी रुग्ण संख्या पाहून इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच आयपीएलमधील राजस्थान रॉयल्ससाठी खेळणारा जलदगती ऑस्ट्रेलियन गोलंदाज अॅण्ड्रयू टाय हा मायदेशी परतला आहे. मायदेशी परतल्यानंतर अॅण्ड्रयूने भारतामध्ये करोना संकट असताना वेगवेगळ्या संघाचे मालक क्रिकेटसाठी एवढा पैसा कसा काय खर्च करु शकतात असा थेट सवाल उपस्थित केला आहे. मात्र त्याचवेळी त्याने करोना कालावधीमध्ये या स्पर्धेमुळे जर भारतीयांचा ताणतणाव दूर होत असेल तर ही स्पर्धा सुरु ठेवली पाहिजे असंही मत व्यक्त केलं आहे.
“या गोष्टीकडे भारतीय दृष्टीकोनातून पाहिल्यास, एकीकडे देशामधील रुग्णालयांमध्ये लोकांना बेड्स उपलब्ध होत नाहीय आणि दुसरीकडे या कंपन्या, संघ मालक, सरकार अशा वेळी आयपीएलवर एवढा पैसा खर्च करत आहेत,” असं अॅण्ड्रयूने म्हटलं आहे. मायदेशात परतल्यानंतर त्याने क्रिकेट डॉट कॉम डॉट एयू या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये या गोष्टीचा उल्लेख केलाय. “जर ही स्पर्धा सुरु ठेऊन लोकांचा ताण कमी होत असेल तर ही एक आशेचा किरण आहे. एखाद्या गुहेमधून दूर कुठेतरी टोकाला प्रकाश दिसावा तसा हा प्रकार असल्याचं म्हणता येईल. खरोखरच असं असेल तर ही स्पर्धा सुरु ठेवली पाहिजे,” असंही अॅण्ड्रयूने स्पष्ट केलं आहे.
“मात्र त्याचवेळी सर्वांनी एकाच पद्धतीने विचार केला पाहिजे अशा विचारांचा मी नाहीय. मी सर्वांच्या विचारांचा सन्मान करतो,” असं सांगत अॅण्ड्रयूने जे योग्य वाटतंय ते केलं पाहिजे असं सांगितलं आहे. आयपीएलमधील सर्व खेळाडू सुरक्षित आहेत. मात्र हे खेळाडू कधीपर्यंत सुरक्षित राहतील हा प्रश्न मला अनेकदा सतावतो, असंही अॅण्ड्रयूने या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे. ३४ वर्षीय अॅण्ड्रयूने करोनाची वाढती रुग्णसंख्या पाहून ऑस्ट्रेलियामध्ये भारतातून येणाऱ्या व्यक्तींवर प्रतिबंध टाकले जातील अशी शंका उपस्थित करत स्पर्धेतून माघार घेत मायदेशी जाण्याचा निर्णय घेतला.
अॅण्ड्रयू हा मुळचा पर्थमधील आहे. सध्या तो पर्थमध्ये परतला असून क्वारंटाइन आहे. विशेष म्हणजे अॅण्ड्रयूने या हंगामामध्ये राजस्थानकडून एकही सामना खेळलेला नाही. एक कोटी रुपये खर्च करुन राजस्थानने अॅण्ड्रयूला आपल्या संघात घेतले होते. त्याने सेन रेडियोशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार. “मी परत येण्याची अनेक कारणं आहेत. मात्र भारतातून पर्थमध्ये येणाऱ्या आणि क्वारंटाइन करण्यात आलेल्या लोकांची संख्या दिवसोदिवस वाढत आहे हे यामागील मुख्य कारण आहे. पर्थ सरकार पश्चिम ऑस्ट्रेलियामध्ये येणाऱ्या व्यक्तींची संख्या कमी करण्यासंदर्भात निर्णय घेण्याची शक्यता असल्याने त्यापूर्वीच मी घरी येणं पसंत केलं,” असं अॅण्ड्रयूने सांगितलं.
“करोनामुळे मला ऑस्ट्रेलियात प्रवेश नाकारण्याआधीच मी परत येण्याचा निर्णय घेतला. बायो बबलमध्ये बराच काळ राहणं हे फार थकवून टाकणारं असतं. ऑगस्टपासून आतापर्यंत मी केवळ ११ दिवस बायो बबलच्या बाहेर होतो. मात्र मला नंतर घरी जायची ओढ लागली आणि मी परत आलो,” असं अॅण्ड्रयूने सांगितलं. अॅण्ड्रयूबरोबरच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या केन रिचर्डसन आणि अॅडम झाम्पानेही खासगी कारणामुळे आयपीएलमधून माघार घेत असल्याची घोषणा केलीय.