भारतामधील करोना परिस्थिती चिंताजनक असून भारत या संकटाला सामोरा जात असला तरी इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच आयपीएल बंद करणे हा काही या समस्येवरील उपाय नसू शकतो, असं मत ऑस्ट्रेलियन गोलंदाज पॅट कमिन्सने व्यक्त केलं आहे. काही दिवसांपूर्वीच कमिन्सने भारतामधील करोना लढ्यासाठी ५० हजार डॉलर म्हणजेच ३७ लाख रुपये मदतनिधी दिला होता. एकीकडे देशामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेत दिवसोंदिवस रुग्णसंख्या वाढत असतानाच आयपीएलचे आयोजन करणं योग्य आहे का यासंदर्भात उलट सुलट चर्चांना सुरुवात झाली असून त्यासंदर्भातच कमिन्सने आपलं मत मांडलं आहे. काहींनी आयपीएल तात्पुरत्या स्वरुपात स्थगित करावं असं म्हटलं आहे तर काही जणांनी तणावाच्या काळात विरंगुळा म्हणून ही स्पर्धा सुरु ठेवावी असं मत व्यक्त केलं आहे.

“आयपीएल स्पर्धा स्थगित करणं हे या समस्येवरील उत्तर आहे असं मला वाटतं नाही,” असं कमिन्सने विनो या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे. “करोनाविरुद्धच्या लढाईमध्ये पहिल्या फळीतील करोना योद्ध्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या कोणत्याही गोष्टी आमच्याकडून (खेळाडूंकडून) वापरल्या जाणार नाहीत याची योग्य ती काळजी घेतली जात आहे. त्यामुळे आयपीएल बंद करणे हे काही या समस्येवरचं उत्तर असल्याचं मला वाटतं नाही,” असं कमिन्स म्हणालाय.

नक्की वाचा >> कमिन्सकडून PM Cares साठी ३७ लाख घेताना करोना Internal Matter असल्याचं मोदी सरकार विसरलं का?

“रोज रात्री आम्ही तीन ते चार तास मैदानात खेळतो. अपेक्षा आहे की दिवसभरामध्ये वेगवेगळ्या समस्यांना तोंड दिल्यानंतर घरी येणाऱ्यांना या क्रिकेट सामन्यांच्या माध्यमातून काही विरंगुळा मिळत असेल,” अशी अपेक्षाही कमिन्सने व्यक्त केली. भारतातील करोनाची दुसऱ्या लाटेसंदर्भात जगभरात चिंता व्यक्त केली जात असतानाच ऑस्ट्रेलियामध्येही भारताला मदत पाठवण्यासाठी वेगवेगळे ग्रुप तयार करण्यात आल्याचं कमिन्सने सांगितलं. “ऑस्ट्रेलियातील लोकांना भारताची मदत करायची आहे. त्यामुळे तेथील काही संस्थांच्या माध्यमातून आम्ही ग्रुप तयार करुन मदत भारतात पाठवण्यासंदर्भातील काम करत आहोत,” असं कमिन्सने म्हटलं आहे.

कमिन्सने भारतातील करोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मदतनिधी दिल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू आणि सध्या आयपीएलमध्ये समालोचक असणाऱ्या ब्रेट लीनेही भारताला मदत म्हणून ४२ लाख रुपये देण्याची घोषणा केली.

Story img Loader