चेन्नई सुपर किंग्जचा महेंद्रसिंह धोनी विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा ऋषभ पंत यांच्यातील लढतीला जणू अनुभवी गुरू विरुद्ध युवा शिष्य असे स्वरूप प्राप्त झाले आहे. शनिवारी वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) लढतीत विजयी सलामी नोंदवण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक आहेत.

संयुक्त अरब अमिरातीत झालेल्या मागील हंगामात दिल्लीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. यंदाच्या हंगामाला सकारात्मक प्रारंभ करून जेतेपदाचे स्वप्न साकारण्याचा निर्धार दिल्ली संघाने केला आहे. तीन वेळा विजेत्या चेन्नईसाठी मागील हंगाम झगडणारा ठरला होता. त्यांची सातव्या क्रमांकावर घसरण झाली होती. ते अपयश मागे टाकण्यासाठी चेन्नई संघ सज्ज झाला आहे.

दुखापतीमुळे श्रेयस अय्यरने माघार घेतल्यामुळे यष्टिरक्षक-फलंदाज पंतकडे नेतृत्वाची धुरा सोपवली आहे. धोनीकडून शिकलेल्या धड्यांना आता अजमावता येईल, अशी ग्वाही पंतने नुकतीच दिली होती. ‘‘कर्णधार म्हणून माझा पहिलाच सामना धोनीविरुद्ध आहे. मी त्याच्याकडून बरेच शिकलो आहे. त्यामुळे हा सामना माझ्यासाठी महत्त्वाचा असेल,’’ असे पंतने म्हटले होते.

दिल्ली कॅपिटल्स

तगडी फलंदाजीची फळी

दिल्लीच्या भक्कम फलंदाजीच्या फळीत शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, स्टीव्हन स्मिथ आणि पंत यांचा समावेश आहे. गतहंगामात धवनने (एकूण ६१८ धावा) दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च धावा काढल्या होत्या. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही त्याने उत्तम कामगिरी केली. पृथ्वीने विजय हजारे करंडक स्पर्धेत एकूण ८२७ धावा फटकावत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील अपयश धुऊन काढले. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकांमध्ये पंत हा भारतासाठी भरवशाचा फलंदाज सिद्ध झाला आहे. याशिवाय दिल्लीकडे मार्कस स्टॉइनिस, शिम्रॉन हेटमायर आणि सॅम बिलिंग्स अशी अष्टपैलू खेळाडूंची तगडी कुमक आहे. इशांत शर्मा, कॅगिसो रबाडा, उमेश यादव, ख्रिस वोक्स आणि आनरिख नॉर्किए असा वेगवान मारासुद्धा सक्षम आहे. रबाडा-नॉर्किए पहिल्या सामन्याला मुकले, तरी त्यांना फारसा फरक पडणार नाही. करोनाची लागण झाल्यामुळे अक्षर पटेल खेळू शकणार नाही, परंतु रविचंद्रन अश्विन आणि अमित मिश्रा हे अनुभवी फिरकी गोलंदाज दिल्लीच्या दिमतीला आहेत.

ऋषभ पंत (कर्णधार), अजिंक्य रहाणे, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टोइनिस, पृथ्वी शॉ, शिखर धवन, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, अक्षर पटेल, अमित मिश्रा, उमेश यादव, कॅगिसो रबाडा, आनरिख नॉर्किए, शिम्रॉन हेटमायर, टॉम करन, सॅम बिलिंग्स, ख्रिस वोक्स, आवेश खान, रिपल पटेल, प्रवीण दुबे, लुकमन मेरिवाला, एम. सिद्धार्थ, विष्णू विनोद, ललित यादव.

चेन्नई सुपर किंग्ज

रैनाचे पुनरागमन

दुसरीकडे, ‘आयपीएल’मध्ये सर्वाधिक एकूण धावा काढणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेला सुरेश रैना (५३६८ धावा) परतल्यामुळे चेन्नईचे सामथ्र्य वधारले आहे. युवा ऋतुराज गायकवाड, फॅफ ड्यू प्लेसिस आणि अंबाटी रायुडू हे अन्य फलंदाज त्यांच्याकडे आहेत. भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात झुंजार लढत देणारा सॅम करन चेन्नईसाठी विजयवीर ठरू शकतो. मधल्या फळीत संघाचा तारणहार धोनी आहे. गेल्या काही महिन्यांत कमालीचा विकसित झालेला वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरवर चेन्नईची भिस्त आहे. शार्दूल वेळप्रसंगी उत्तम फटकेबाजीही करू शकतो. रवींद्र जडेजा आणि मोईन अली हे अष्टपैलू खेळाडूसुद्धा सामन्याचे चित्र पालटू शकतात.

*  जोश हॅझलवूडच्या जागी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेसन बेहरेंड्रॉफचा चेन्नईच्या ताफ्यात समावेश करण्यात आला आहे. आगामी व्यग्र हंगामाच्या पार्श्वभूमीवर विश्रांती मिळावी म्हणून हॅझलवूडने यंदाच्या ‘आयपीएल’मधून माघार घेतली आहे.

महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, फॅफ ड्यू प्लेसिस, सुरेश रैना, चेतेश्वर पुजारा, मोईन अली, रवींद्र जडेजा, दीपक चहर, शार्दूल ठाकूर, मिचेल सँटनर, लुंगी एन्गिडी, कर्ण शर्मा, कृष्णप्पा गौतम, सॅम करन, जेसन बेहरेंड्रॉफ, इम्रान ताहिर, भगत शर्मा, हरिशंकर रेड्डी, सी. हरी निशांत, नारायण जगदीशन, के. एम. आसिफ, आर. साईकिशोर, भगत वर्मा.

* वेळ : दुपारी ७.३० वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोटर््स १, स्टार स्पोटर््स २, स्टार स्पोटर््स १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्या)