आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात मंगळवारी दिल्ली कॅपिटल्सचा पहिला पराभव झाला. कोलकाता नाईट राइडर्सने तीन विकेट्स राखत विजय नोंदवला. या सामन्यात केकेआरचा कर्णधार इऑन मॉर्गन आणि दिल्ली कॅपिटल्सचा फिरकीपटू आर अश्विन यांच्यात जोरदार वाद झाल्याचे पाहायला मिळाले. हा वाद सोडवण्यासाठी केकेआरचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिकला मात्र सारखी मध्यस्थी करावी लागली होती. सामना संपल्यानंतर कार्तिकने मॉर्गन आणि अश्विन यांच्यात संघर्ष का झाला याची संपूर्ण कहाणी सांगितली आहे.
केकेआरने कमी धावसंख्येच्या सामन्यात दिल्लीचा तीन गडी राखून पराभव केला. पण जेव्हा केकेआरचा क्षेत्ररक्षक राहुल त्रिपाठीने थ्रो फेकला आणि तो दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतला लागला आणि चेंडू पुढे गेला तेव्हापासून हा वाद सुरू झाला. यामध्ये अश्विनला अतिरिक्त धाव चोरण्याची इच्छा होती. कर्णधार मॉर्गनला हा प्रकार आवडला नाही आणि टीम साउदीच्या चेंडूवर अश्विन बाद झाल्यावर त्याने हे त्याला सांगितले असा खुलासा कार्तिकने केला.
यानंतर संतप्त अश्विन मैदान सोडून जात होता, नंतर थांबला आणि केकेआरच्या कर्णधाराकडे जाताना दिसला. त्यानंतर कार्तिक दोघांच्या मध्ये आला आणि त्याने अश्विनला मैदान सोडण्याचा आग्रह केला. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध तीन विकेट्सच्या विजयानंतर कार्तिक म्हणाला, “मला माहित आहे की जेव्हा राहुल त्रिपाठीने चेंडू फेकला आणि तो ऋषभ पंतच्या शरीराला लागून दूर गेला, तेव्हा अश्विनने एक धाव घेण्याची मागणी केली आणि त्याने धाव घ्यायला सुरुवात केली.”
“मला वाटत नाही की मॉर्गनला ते आवडले. मला वाटते की त्याला अपेक्षा आहे की जर चेंडू फलंदाजाला किंवा बॅटला लागला तर तो खेळ भावनेने खेळाडू धाव घेणार नाही. हा एक अतिशय मनोरंजक विषय आहे, त्यावर माझा स्वतःचा दृष्टिकोन आहे. पण सध्या मी एवढेच म्हणेन की मी या प्रकरणाला शांत करण्यात भूमिका बजावली याचा आनंद आहे आणि आता गोष्टी ठीक आहेत,” असे कार्तिक म्हणाला.