मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबादच्या सामन्यामध्ये रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईतील कठीण खेळपट्टीवर खेळताना मोठी धाव संख्या उभारण्याच्या दृष्टीकोनातून रोहितने फलंदाजीचा निर्णय घेतला. आपला निर्णय योग्य असल्याचं रोहित आणि त्याच्यासोबत फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकने सिद्ध केलं. पॉवर प्लेमध्येच दोघांनी संघाची धावसंख्या ५३ पर्यंत नेली. मात्र सातव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर रोहित झेलबाद झाला आणि मुंबईची सलामीची जोडी फुटली. कर्णधार रोहितने २५ चेंडूंमध्ये ३२ धावांची खेळी केली. १२८ च्या सरासरीने या धावा करताना रोहितने दोन चौकार आणि दोन षटकार लगावले. रोहितने डीप मिड विकेटला उभ्या असणाऱ्या विराट सिंगकडे झेल दिला. विजय शंकरच्या गोलंदाजीवर रोहित बाद झाला. मात्र या ३२ धावांच्या खेळीमध्ये रोहितने एक विक्रम आपल्या नावे करुन घेतलाय.
रोहितने या सामन्यामध्ये दुसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर मुजिबला षटकार मारत २१७ षटकारांचा विक्रम केला. त्यानंतर रोहितने तिसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर भुवनेश्वर कुमारला षटकार लगावला. या दोन षटकारांसहीत रोहितने आयपीएलमध्ये लगावलेल्या षटकारांची संख्या २१८ इतकी झालीय. रोहितने सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार लगवाणाऱ्या भारतीयांमध्ये रोहित २१८ षटकारांसहीत पहिल्या क्रमांकावर आहे. धोनी २१६ षटकारांसहीत दुसऱ्या, विराट कोहली २०१ षटकारांसहीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्या खालोखाल चौथ्या क्रमांकावर १९८ षटकारांसहीत धोनीचा संघसहकारी सुरेश रैना आहे. पाचव्या क्रमांकावर रॉबिन उथप्पा आहे. रॉबिनने आयपीएलमध्ये १६३ षटकार लगावले आहेत.
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार लगावणाऱ्यांमध्ये ख्रिस गेल हा पहिल्या क्रमांकावर असून त्या खालोखाल ए. बी. डिव्हिलियर्स आणि रोहित शर्माचा क्रमांक लागतो. गेलने आयपीएलमध्ये ३५१ षटकार लगावले आहेत. डिव्हिलियर्सने २३७ षटकार लगावलेत तर रोहितने २१८ षटकार लगावले आहेत. सर्वाधिक षटकार लगावणाऱ्यांच्या यादीत धोनी चौथ्या क्रमांकावर आहे.
Most sixes among Indians in IPL:
217* – Rohit Sharma
216 – MS Dhoni
201 – Kohli
198 – Raina
163 – UthappaOverall:
351 – Gayle
237 – ABD
217* – Rohit#IPL2021 #MIvsSRH— Bharath Seervi (@SeerviBharath) April 17, 2021
यंदाच्या हंगामामध्येही गेल, डिव्हिलियर्स, विराट, धोनी, रोहित यासारख्या खेळाडूंकडून षटकारांचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याने एकीकडे सामन्यांची स्पर्धा सुरु असतानाच दुसरीकडे ही सर्वाधिक षटकारांची शर्यतही रंजक ठरेल यात शंका नाही.