आपल्या संस्कृतीत हनुमंतांचं महत्त्व असाधारण आहे. कोणतंही मोठं कार्य हाती घ्यायचं तर पहिल्यांदा शक्तीचा विचार करावा लागतो. ही शक्ती तीन प्रकारची असते. पहिली इच्छाशक्ती, दुसरी ज्ञानशक्ती आणि तिसरी क्रियाशक्ती. हनुमंतांकडे या तीनही शक्ती प्रचंड प्रमाणात होत्या. हनुमान जयंतीनिमित्ताने या शक्ती आपल्यात कशा आणता येतील त्याविषयी..
सध्या चैत्र महिना चालू आहे. आल्हाददायक वसंत ऋतूचं आगमन झालेलं असल्याने जिकडेतिकडे उत्साहाचं वातावरण आहे. हे वातावरण द्विगुणित करणारे गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती हे उत्सवही याच महिन्यातले. मागच्या लेखात गुढीपाडव्याचं आपल्या जीवनातलं महत्त्व पाहिलं. श्रीरामांच्या आदर्श जीवनाचा विचार, त्याचं मनन (आणि शक्य तितकं आचरण) आपल्या जगण्याला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातं. कालच हनुमान जयंती झाली. त्यानिमित्ताने आज आपण हनुमान जयंतीचा आपल्याशी, आपल्या जीवनाशी, आनंदाशी असणारा संबंध पाहणार आहोत.
चैत्र महिन्यातली पौर्णिमा हा हनुमान जयंतीचा दिवस. सकाळी सहा ते साडेसहा ही हनुमान जन्माची वेळ. रात्र आणि दिवस यांना जोडणारा हा काळ. अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा मार्ग. आपल्या संस्कृतीत आबालवृद्धांना भावणाऱ्या हनुमंतांचं महत्त्व असाधारण आहे. आपल्या महाराष्ट्रात समर्थ रामदास स्वामींनी आणि उत्तरेत गोस्वामी तुलसीदासांनी हनुमंतांचं महत्त्व वाढवलं. श्रीसमर्थानी स्वत:ची तपसाधना पूर्ण झाल्यावर बारा वर्षे पायी भारतभ्रमण केलं आणि त्या वेळची सामाजिक परिस्थिती जवळून अभ्यासली. जुलमी परकीय सत्तेविरुद्ध लढण्याची इच्छाच जणू लोकांमध्ये नव्हती. समाजाला विशेषत: तरुणांना जागं करून स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा आणि विश्वास देणं गरजेचं आहे, अशी श्रीसमर्थाना जाणीव झाली. त्याकरता जनतेसमोर एक आदर्श (रोल मॉडेल) लोकांपुढे ठेवण्याकरिता त्यांनी हनुमानाची निवड केली. हनुमानाचीच निवड त्यांनी का केली असावी हे हनुमानाचं चरित्र पाहिल्यावर सहज कळून येईल. श्रीसमर्थानी ‘भीमरूपी’ या मारुती स्तोत्रातून आणि तुलसीदासांनी ‘हनुमानचालीसा’ या स्तोत्रातून याचं वर्णन केलं आहे.
कोणतंही मोठं कार्य हाती घ्यायचं तर पहिल्यांदा शक्तीचा विचार करावा लागतो. ही शक्ती तीन प्रकारची असते. पहिली इच्छाशक्ती, दुसरी ज्ञानशक्ती आणि तिसरी क्रियाशक्ती. हनुमंतांकडे या तीनही शक्ती प्रचंड प्रमाणात होत्या. ‘अतुलित बलधाम’, ‘ज्ञान गुणसागर’, ‘महावीर विक्रम बजरंगी’ अशी विशेषणं तुलसीदासांनी वापरली आहेत, तर ‘भीमरूपी’, ‘वज्रहनुमान’, ‘महाबळी’ इत्यादी विशेषणं श्रीसमर्थानी वापरली आहेत. परंतु शक्ती जर योग्य दिशेने वापरली नाही तर ती तारक न ठरता मारक होऊ शकते, म्हणून ‘अॅटिटय़ूड’ फार महत्त्वाचा असतो व म्हणून श्रीहनुमान हे सर्व शक्तींनी युक्त असूनही कायम श्रीरामाचे दास म्हणूनच वावरले. शक्ती कशी वापरावी याचं हनुमान चरित्राइतकं चांगलं उदाहरण क्वचितच पाहायला मिळेल.
हनुमानाची प्रचंड शक्ती आपल्या सर्वानाच माहिती आहे, पण त्यांना ‘ज्ञानिनां अग्रगण्यम्’ , ‘बुद्धिमतां वरिष्ठम्’ असंही म्हटलेलं आहे. आपल्यात एक असा समज आहे की शक्तिमान माणूस सहसा बुद्धिमान नसतो आणि बुद्धिमान माणूस शक्तिमान नसतो. पण हनुमान दोन्ही होते. जेव्हा सीतामातेचा शोध घेण्याची कामगिरी त्यांच्याकडे सोपवली गेली त्या वेळी त्यांनी स्वत: तर सीतामाईंना पाहिलेलं नव्हतं. त्या खूप सुंदर आहेत असं वर्णन ऐकलेलं होतं. म्हणून लंकेमध्ये जेव्हा त्यांना प्रथम मंदोदरी दिसली त्या वेळी ही सुंदर स्त्रीच सीतामाई असेल असं प्रथमदर्शनी त्यांना वाटलं. पण त्यांनी विचार केला, की माणूस बारूपापेक्षा अंतरंगावरून ओळखायचा असतो. सीतामाई या रामाच्या परम भक्त आहेत हे माहिती असल्यामुळे त्यांना मंदोदरीच्या महालातून रामनाम ऐकू न आल्यामुळे त्या सीतामाई नाहीत हे त्यांनी ओळखलं. परंतु अशोकवनात, शरीराने म्लान अवस्थेत असूनही, केवळ रामनामाचा जप ऐकू आल्यामुळे याच सीतामाई आहेत हे ओळखलं. या प्रसंगात त्यांच्या बुद्धीची अजून एक छटा दिसून येते. ती म्हणजे, जेव्हा आपल्याकडे शक्ती (सिद्धी) असते तेव्हा त्याचा उपयोग कुठे आणि कसा करायचा याकरिता सूक्ष्म बुद्धी लागते. तुलसीदासांनी म्हटलं आहे की, ‘सूक्ष्म रूप धरी सियही दिखावा’. श्रीरामांच्या पत्नी, सीतामाईसमोर त्यांनी अगदी सूक्ष्म रूप म्हणजे लक्षार्थाने त्यांनी अत्यंत नम्र भाव धारण केला. पण त्यानंतर रावणाला श्रीरामांच्या सामर्थ्यांची चुणूक दाखवताना त्यांनी विकट रूप धारण केले ( ‘बिकट रूप धरी, लंक जलावा’). त्यांना रावणाला हे दाखवायचं होतं की श्रीरामांच्या सेनेतला एक सेवकही जर इतका सामथ्र्यवान असेल तर त्याचा स्वामी किती सामथ्र्यवान असेल. शत्रूचे मनोबल कमी करण्याची स्ट्रॅटेजी ही ते बुद्धिवान असल्याचीच साक्ष देते. पुढे प्रत्यक्ष युद्धातही ‘भीमरूप धरी असुर संहारे’. त्यांच्या बुद्धीची अशी अनेक उदाहरणे रामायण जर नीट समजून घेतलं तर उघडकीस येतील.
शक्ती, बुद्धी दोन्ही असेल, पण कामाचा उत्साह नसेल, तर कोणतंही चांगलं कामही होऊ शकणार नाही. म्हणून ‘राम काज करिबे को आतुर’ असेही श्रीहनुमान होते. श्री हनुमान दाखवून देतात की कार्य पूर्ण होईपर्यंत विश्रांती नाही. यासंबंधीची एक गोष्ट रामायणात आहे. समुद्र उल्लंघून लंकेत जात असताना मैनाक पर्वत समुद्रातून वर आला व त्याने श्री हनुमंतांना ‘थोडी विश्रांती घ्यावी’ म्हणून विनंती केली. पण हनुमानांनी त्याला नम्रपणे, ‘कार्यसिद्धी होईपर्यंत विश्रांती नाही’ असं सांगितलं व ते पुढे निघाले. तसेच लक्ष्मणासाठी संजीवनीची गरज भासल्यानंतर त्यांनी ताबडतोब हिमालयाकडे प्रयाण केलं. अख्खा द्रोणागिरीच उचलून लंकेत आणला व काम फत्ते झाल्यावर लगेच पुन्हा होता त्या ठिकाणी नेऊन ठेवला. याला ‘क्विक थिंकिंग आणि करेक्ट अॅक्शन’ म्हणतात आणि व्यवस्थापनाच्या भाषेत याला ‘प्रोजेक्ट क्लोजर’ असं म्हणतात.
हनुमान यांचा अजून एक गुण म्हणजे ते अभिमानरहित आहेत. बऱ्याच वेळा आपला अभिमान/अहंकार (म्हणजे ‘मी आणि माझे’) हे आपल्या मानसिक तणावाचे मुख्य कारण असते. रामायणात एक प्रसंग आहे. सीताशोध घेऊन हनुमंत श्रीरामांना भेटतात. श्रीराम त्यांना म्हणतात ‘सुनु कपि तोहि समान उपकारी’. म्हणजे ‘तुझ्यासमान माझ्यावर उपकार करणारा मनुष्य, मुनी किंवा कोणतीही देवता नाही. त्यामुळे तुझे उपकार मी कसे फेडू हे मला कळेनासं झालंय’. प्रत्यक्ष श्रीरामांनी इतकी स्तुती केल्यावर कुणालाही अभिमान/अहंकार साहजिकच वाटेल. पण श्रीराम त्यांची जणू परीक्षाच पाहत होते. कदाचित थोडा जरी अहंकार याच्यात असेल तर तो आता बाहेर येईल . परंतु हनुमान म्हणाले, ‘चरण परेउ प्रेमाकुल, त्राहि त्राहि भगवंत’ म्हणजे ‘प्रभु मला अभिमानाच्या/अहंकाराच्या भोवऱ्यात अडकवू नका. माझे रक्षण करा’. काय ही विनयशीलता!
अशा श्रीहनुमंतांची उपासना करून, त्यांचे गुण ग्रहण करून, श्रीसमर्थानी ‘रामदास’ म्हणून लोकांसमोर स्वत:च एक आदर्श निर्माण केला. त्यांनी केवळ अकरा मारुतींचीच स्थापना केली असं नाही, तर मारुतीच्या उपासनेची चळवळच सुरू केली. प्रत्येक गावात मारुतीचं एक तरी देऊळ असेल अशी योजना आखली. सशक्त, बलवान देहाचे महत्त्व समर्थानी लोकांमध्ये रुजविलं. त्यासाठी जोर-बैठका, सूर्यनमस्कार असे (सहज करता येण्यासारखे) व्यायामप्रकार लोकांना शिकविले. अजूनही व्यायामशाळांमध्ये, तालमीमध्ये मारुतीची स्थापना असते. तसेच अशा ठिकाणी शांततेत, मन लावून व्यायाम केला जातो. व्यायामामध्ये शरीर-मन-बुद्धीचे ऐक्य असणं महत्त्वाचं आहे. श्रीसमर्थानी हनुमानाचे ‘सौख्यकारी, दु:खहारी’ असं वर्णन केलं आहे. सर्वानाच सुख हवं असतं. सुख हे साध्य आहे, पण त्याचं नेमकं साधन काय आहे यासंबंधी संभ्रम असल्यामुळे केवळ आजूबाजूला बघून ‘पैसा’ हे साधन आहे असं सर्वसाधारणपणे ठरवलं गेलं. पैशाने काही प्रमाणात देह सुख मिळेल यात काहीच शंका नाही, पण दु:खाचं हरण कसं होणार? सुख-दु:ख हे जरी विरोधी अनुभव असले तरी गणिताप्रमाणे सुख म्हणजे पॉझिटिव्ह आणि दु:ख म्हणजे निगेटिव्ह समजून माझ्याकडे दहा सुखाची कारणे आहेत आणि दोन दु:खाची कारणे आहेत, तर १० – २ = ८ असं म्हणून माझ्याकडे आता फक्त सुखच आहे (८ सुखाची कारणे ) असं होत नाही. उलट एक दु:खाचं कारणही शंभर सुखांच्या कारणावर पाणी फिरवू शकतं. (उदाहरणार्थ शरीराची साथ नसेल तर सुख उपभोगणार कसं?) अशा वेळी प्रश्न पडतो की हनुमान हे दु:खहारी कसे? याची अनेक स्पष्टीकरणे असतील, परंतु मला भावलेलं स्पष्टीकरण असं :- बऱ्याच वेळा भय हे माणसाच्या दु:खाचं कारण असतं. काही वेळा आपलं भय बोलूनही दाखवता येत नाही. उदाहरणार्थ मृत्यूचे भय. सततच्या भयाचा परिणाम शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होऊ शकतो. अशा भयातून मुक्तता होण्यासाठी कोण्या सामथ्र्यवान आणि दयावान अशा आधाराची गरज असते. श्रीसमर्थानी हनुमंतांचे वर्णन ‘काळाग्नी काळरुद्राग्नी देखता कापती भये’ असं केलं आहे. प्रत्यक्ष काळ त्यांना घाबरत असेल तर आपलं भय ( दु:ख) ते सहज निवारण करू शकतील अशी श्रद्धा आणि त्यानुसार येणारा सकारात्मक दृष्टिकोन मनाची शांतता वाढवायला मदत करतो आणि आपोआपच दु:खाची निवृत्ती होते.
रामायणात जिथं हनुमंतांचं चरित्र आलेलं आहे त्या प्रकरणाचं नावच ‘सुंदरकांड’ असं आहे. यातील आलेल्या हनुमंतांच्या गुणांच्या संवर्धनाने आपले जीवन सुंदर, शांत आणि आनंदमय होईल
– अंजली श्रोत्रिय