आकाशातून यथेच्छ पडणारा पाऊस आपल्याला चिंब भिजवून ‘मन झिम्माड झालं’ची अनुभूती देतो. म्हणूनच जेव्हा खूप आनंद होतो तेव्हा आपण सहज म्हणतो, ‘‘आनंदात न्हालो!’’ पण पावसात यथेच्छ भिजायला अनेकदा आपलं ‘मोठ्ठं’ होणं आडवं येतं. बर्नार्ड शॉचं म्हणणं आहे की ‘आपण वृद्ध होतो म्हणून खेळणं थांबवत नाही तर खेळणं थांबवतो म्हणून वृद्ध होतो.’ प्रौढत्वाची पांघरलेली शाल जरा बाजूला करून हवंहवंसं वाटणारं पावसातलं भिजणं खरंच अनुभवायला हवं..
निसर्गाचं एक विशिष्ट असं चक्र आहे. दिवस-रात्र, महिने, वर्षे अशा कालमानात त्याचं भ्रमण अनुभवाला मिळतं. या कालमानाप्रमाणे मोसम बदलतात. पश्चिमात्य देशांमध्ये एका वर्षांमध्ये चार मोसम असतात. उन्हाळा आणि हिवाळा हे चार चार महिन्यांचे मुख्य सीझन्स व स्प्रिंग आणि फॉल हे त्यांना जोडणारे दोन दोन महिन्यांचे सीझन्स. आपल्याकडे तसं नाही. प्रत्येक वर्ष हे सहा ऋतूंमध्ये विभागलं गेलेलं आहे आणि प्रत्येक ऋतूसाठी दोन दोन महिने हा समान वाटा आहे. म्हणूनच ग्रीष्म ऋतू संपला की जूनमध्ये वर्षांऋतूच्या आगमनासाठी सर्वजण आसुसलेले असतात. शेतकरी वर्ग पावसाकडे डोळे लावून बसलेला असतो. नांगरणी करून, कडक उन्ह देऊ न त्याने जमीन पिकासाठी तयार केलेली असते आणि सात जूनचे मृग नक्षत्र पाऊस घेऊन येईल अशी त्याची आशा/श्रद्धा असते.
पाऊस..! लहान मुलांपासून ते मोठय़ा माणसांपर्यंत, खेडय़ातल्या शेतांपासून ते शहरातल्या शेअर बाजारापर्यंत, कोमल मनाच्या कवीपासून ते मुरलेल्या राजकारण्यांपर्यंत सर्वाना हवाहवासा वाटणारा पाहुणा म्हणजे पाऊस. इंग्लंडसारख्या देशात सतत पडणाऱ्या पावसामुळे आणि थंड हवामानामुळे तिथल्या मुलांची ‘रेन रेन गो अवे’ अशी तक्रार असते, तर आपल्याकडच्या उष्ण हवेमुळे आणि वर्षांतून एकदाच येणाऱ्या पावसाळ्यामुळे आपली लहान मुले त्यांचा ‘खाऊचा पैसा’ बक्षीस देऊन ‘येरे येरे पावसा’ असा गोऽऽड हट्ट करत असतात. एकूण काय मुलांना उन्हा-पावसात खेळायचं असतं हेच खरं! मुलांनाच काय पण मोठय़ांनाही मनापासून हेच हवं असतं, पण ते कबूल करायला त्याचं ‘मोठ्ठेपण’ आडवं येतं. मग काय, घरात बसूनच (गरम गरम भजी खात) बाहेरचा पाऊस ‘बघत’ दुधाची तहान ताकावर भागवली जाते.
मग प्रश्न असा येतो की, आपल्याला पावसात भिजायला का आवडतं? यामागे एक सूक्ष्म कारण असावं आणि ते पंचभूतांशी निगडित आहे. आपल्या आजूबाजूला पंचभूतांचं अस्तित्व सृष्टीच्या रूपाने आहे. त्याकडे सहसा आपलं लक्ष जात नाही. बघा ना, सभोवताली एवढं निरभ्र, निळं आकाश असतं. त्याकडे पाहायला आपल्याला जमतं? जर पाहणंच जमणं एवढं कठीण तर त्याचं कौतुक करायला कसं जमणार? सकाळ-संध्याकाळी आकाशात दररोज बदलणाऱ्या-अक्षरश: क्षणाक्षणाला अपडेट होत जाणाऱ्या या मनमोहक आणि विश्वव्यापी स्क्रीनकडे बघायला, त्याचा आनंद घ्यायला जमतं आपल्याला? पृथ्वीवर राहात असूनही ‘पृथ्वी’ या पंचमहाभूतातल्या एका महाभूताशी आपलं नातंच तुटल्यासारखं झालंय. लहानपणी मातीत खेळणारे आपण आता (मोठे झाल्यावर) हातापायाला जरासुद्धा मातीचा स्पर्श होऊ देत नाही. परंतु आवडीने बागकाम करणाऱ्याला मातीत हात घातल्यानंतर काय आनंद होतो ते विचारा. अनेकजण पावसाळ्यात जवळच्या टेकडीवर/बागेत जाऊन ते झाडे लावतात आणि त्याचा आनंद घेतात.)
आप किंवा पाणी हे पंचमहाभूतातील अजून एक महाभूत. इथे आपण याच महाभूताबद्दल बोलत आहोत. या महाभूताची गंमत काही औरच आहे. पाणी ही अशी गोष्ट आहे की जिचा स्पर्श आपल्या शरीराला ताजेतवाने करतो. रोजच्या आंघोळीचेच उदाहरण घ्या ना ! तसंच पावसाळ्यात आकाशातून यथेच्छ पडणारा पाऊस आपल्याला चिंब भिजवून ‘मन झिम्माड झालं’ची अनुभूती देतो. म्हणूनच जेव्हा खूप आनंद होतो तेव्हा आपण सहज म्हणतो ‘आनंदात न्हालो’!
बर्नार्ड शॉ या प्रसिद्ध इंग्लिश नाटककाराचं म्हणणं आहे की ‘आपण वृद्ध होतो म्हणून खेळणं थांबवत नाही तर (उलट) खेळणं थांबवतो म्हणून वृद्ध होतो’. वय वाढताना मैदानावर जाऊन शारीरिक खेळ खेळणं बऱ्याच जणांना शक्य नसतं. अशा वेळी वृत्ती खिलाडू ठेवणं तर शक्य आहे? प्रौढत्वाची उगीचच पांघरलेली शाल जरा बाजूला करून निसर्गाशी एकरूप होणं तर शक्य आहे. निसर्गात आनंद/शांती भरलेली आहे. आपला आतला आनंद त्या आनंदाशी एकरूप होईल व ‘आत-बाहेर कोंदलेला’ आनंद आणि त्या अनुषंगाने येणारी शांती अनुभवता येईल व मन प्रसन्न होण्यास मदत होईल. या संदर्भात एक गीत आठवतं :
कुठे शोधिसी रामेश्वर अन् कुठे शोधिसी काशी
हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी
भगवंत हा आनंदरूप आहे आणि तो हृदयातच आहे. आपल्याला केवळ त्याचं भान असणं आवश्यक आहे.
.. तर आपली गोष्ट चाललीय पावसाची-पाण्याची. या पावसाच्या आकर्षणाची! आपलं शरीरही जवळजवळ सत्तर टक्के पाण्यानं भरलेलं आहे आणि पृथ्वीचा सत्तर टक्के भागही पाण्यानेच व्यापलेला आहे, हे तर या आकर्षणामागचं एक कारण नसेल ना? आपल्या शरीरातल्या सर्व पेशींच्या आत आणि बाहेरही पाणीच असतं. याला इंट्रासेल्युलर आणि एक्स्ट्रासेल्युलर फ्लुईड म्हणतात. या फ्लुईडमधल्या मिनरल्सचं संतुलन असणं हे उत्तम आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असतं. निसर्गातलं आणि शरीरातलं संतुलन अशा रीतीनेही पाण्याशी निगडित आहे तर! ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ हेच खरं!
ब्रह्मांडावरून आठवलं. ब्रह्मांडातल्या एका ग्रहावर म्हणजेच पृथ्वीवर आपण राहतो. वरती चहुबाजूंनी आभाळ/आकाश दिसतं. ही धरती आणि आकाश एकमेकांकडे सतत पाहात असतात. वारा वहात वहात पृथ्वीला स्पर्श करतो आणि अवकाशात विलीन होतो. पक्षीही काही अंशी पृथ्वी आणि अवकाश यात भ्रमण करतात. परंतु मला असं वाटतं की पृथ्वी आणि आभाळाचा दुरावा सहन न होऊन पाऊस जणू काही मध्यस्थाची/माध्यमाची भूमिका घेऊन बरसत्या धारांनी त्यांचं मीलन घडवून आणतो. या ‘नभी दाटलेल्या घन-घन माला’ जेव्हा धरतीवर बरसू/कोसळू लागतात तेव्हा धरती हिरव्यागार वनश्रीने भरून आणि भारून तर जातेच. अशा वेळी मोरही केकारव करत, पिसारा फुलवत नाचून धरतीच्या आनंदाचा संदेश देतात.
या पावसाकडे केवळ शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर ते केवळ पाणी म्हणजे एच-टू-ओ असतं. व्यावहारिक दृष्टीने पाऊस म्हणजे धरणात पाणी साठवण्याची वस्तू. जगण्यासाठी याची अत्यंत आवश्यकता आहे हे आपण गेलं वर्षभर अनुभवतो आहोत. हे सत्य असलं तरी निसर्ग आपल्यासाठी काय काय करत असतो याची जाणीवही हा पाऊस करून देत असतो. आपण निसर्गाशी कठोरपणे वागत असलो तरी निसर्ग त्याचा चांगुलपणा सोडायला तयार नसतो. हा निसर्गाचा गुण बघूनच तुकाराम महाराज ‘वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे’ असं म्हणाले नसतील ना?
आपल्याकडे पावसाचं आणि आषाढाचं अगदी घट्ट नातं आहे. आपल्या सर्वानाच माहिती आहे की पावसाचं पाणी आभाळातून जमिनीवर पडलं की प्रथम ते तप्त धरा शांत करतं. अजूनही पाऊस पडत राहिला तर त्या पाण्याचे ओहोळ होतात. अनेक ठिकाणीचे ओहोळ वाहत वाहत एकत्र येत त्याचेच ओढे किंवा नाले होतात. असे अनेक नाले नदीला मिळतात. नद्यांना पूर येतात व पाण्याने भरलेल्या अशा अनेक नद्या शेवटी खऱ्या अर्थाने त्यांच्या मूळ स्वरूपात म्हणजेच समुद्रात विलीन होतात. कारण त्यांना भरून टाकणारं पाणी तिथूनच ढगांच्या आणि पावसाच्या रूपाने आलेलं असतं ना! आषाढ महिन्यातही असाच ‘भक्तीचा पाऊस’ वारकऱ्यांच्या मनाला ओलावा देतो. अशा अनेक वारकऱ्यांचे मग ओहोळ (दिंडय़ा), नद्या (वारी) होतात व शेवटी पंढरपूरला संगम होतो. हा भक्तीचा पाऊस दरवर्षी आषाढात येतोच येतो. तो वेधशाळेच्या अंदाजावर किंवा एल निनोच्या येण्या-जाण्यावर अवलंबून नसतो.
तर आता तात्पर्य : आकाशातून बरसणारा पाऊस आपल्याला काय सांगत आहे? तो सांगतोय आषाढ सरींबरोबर येणाऱ्या आषाढ वारीत मनाने तरी सामील होऊ या. बाहेरून पावसाच्या पाण्याची शीतलता अनुभवू या आणि आतून मनाने भक्तीच्या पुरात पोहायला उतरू या. वारकऱ्याला पांडुरंगाच्या दर्शनाशिवाय काहीच मागणे मागायचे नसते. म्हणून तो ‘मोकळा’ असतो. असा माणूसच गाऊ शकतो आणि नाचू शकतो. अगदी लहान मुलांमध्येसुद्धा मोकळेपणा हाच गुण प्रकर्षांने असतो.
तेव्हा.. बाहेर पाऊस पडतोय. आपण पुन्हा (मनाने) लहान होऊ या. डोळे मिटून पाऊस अंगावर घेऊ या. दोन्ही हात . हो, हो दोन्ही हात पसरून (कारण सेल्फी काढून कुणाला पाठवायची नाहीये!) स्वत:भोवती गिरक्या घेत म्हणू या, ‘ये रे , ये रे, पावसा..’
-गीता ग्रामोपाध्ये
health.myright@gmail.com