ग्रेड परीक्षेच्या वेळापत्रकानुसार हा तिसरा पेपर दोन्ही परीक्षेच्या विद्यार्थ्यांना द्यावयाचा असतो. हा विषय रचनाचित्रसारखा रंगवावयाचा असतो. एखादा प्रसंग, घटना (प्रत्यक्ष पाहिलेला) आठवून ते चित्ररूपात मांडता येणे आवश्यक असते. ज्या गोष्टी, घटना, प्रसंग नित्य पाहिले जातात त्याचे चित्ररूपात प्रकटीकरण करता आले पाहिजे, प्रत्यक्ष न पाहिलेल्या किंवा कल्पनेने विषयाची मांडणी करून रंगकाम करता आले पाहिजे, असे अपेक्षित असते.
स्मृतिचित्र म्हणजे पाहिलेल्या गोष्टींची केवळ नोंद नाही तर प्रत्यक्ष स्मृतीतल्या गोष्टींचे चित्ररूपात घडविलेले, रेखाटलेले दर्शन आहे. हे घडवित असताना काही गोष्टी टाकून काही गोष्टींना महत्त्व देणे व त्याची कलापूर्ण रचना करून रेखाटणे याची गरज आहे. आपणास निरीक्षणाची आणि प्रमाणबद्ध रेखाटन करण्याची नितांत गरज असते. तीच या स्मृतिचित्राच्या चित्रनिर्मितीची खरी सामग्री आहे. या विषयाचा परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी कोणत्याही पाहिलेल्या गोष्टीचे रेखाटन (स्केच) एखाद्या वहीमध्ये केल्यास आणि अनेक विविध रेखाटन केल्यास संदर्भासाठीही वापर करता येईल. या स्केचेसमुळे तुमची स्मृती पक्की होण्यास मदत होईल. पशू-पक्ष्यांची वैशिष्टय़े आणि मानवाकृतींच्या हालचाली सोबत देण्याचा प्रयत्न केला आहे. ही चित्रे जशीच्या तशी न काढता तुमच्या स्मृतीत साठवा आणि त्याचा योग्य तो आधार घेऊन नवीन विषय रेखाटण्याचा प्रयत्न करा.

तुम्ही प्रत्यक्ष चित्र रेखाटताना ‘चित्ररचना’ कशी केली आहे त्याकडे विशेष परीक्षेत पाहिले जाते. विशेषत: चित्ररचनेतील पाश्र्वभूमीला विशेष महत्त्व असते. त्यामुळे तुम्ही रेखाटलेल्या विषयातील आशय स्पष्ट होतो. तुमच्या रेखाटनात आकाराची निवड आणि सुसंगत मोजणी आवश्यक असते. रेखाटनातील चित्रघटकांना कमी-अधिक (लहान-मोठे आकारमानात रेखाटल्यास) महत्त्व दिल्याने चित्रात जिवंतपणा येतो. रेखाटनात एकसंधीपणा असणे जरुरीचे आहे. चित्राचे मांडणीत एकमेकांशी नाते असणे आवश्यक. आपल्या चित्रात कोणाला महत्त्व द्यावयाचे हे सर्वस्वी आपल्यावरच अवलंबून असते. पण तसे महत्त्व कशालातरी देणे रचना सौंदर्याच्या दृष्टीने आवश्यक आहे.
आतापर्यंत आपण रेखाटन-रचना मांडणी याचा विचार केला. आता आपण रंगसंगतीकडे वळूया. चित्रात एखाद्या विशिष्ट रंगाचा उठाव साधला गेला तर ते परिणामकारक ठरते. रंग जितका आल्हाददायक असेल तेवढे चित्र आकर्षक वाटते. रंगाचा तोल साधणेही आवश्यक असते. चित्राची रंग, रचना सर्वत्र फिरणारी असावी. उत्तम रंगसंगती साधण्यासाठी विविध रंगांची रंगमिश्रणे तयार करून पाहण्याचा सराव करा. मुक्तपणे रंगांचा वापर करा. मात्र चित्र आकर्षक झाले पाहिजे. तुमच्या चित्रात हेतुपुरस्सर काही रंग टाकून बघा. त्यामुळे कदाचित तुमची रंगसंगती सुसंवादी झाल्याचे आढळून येईल.

महत्त्वाच्या सूचना
१) स्मरणचित्राचे सरावासाठी रोज थोडा वेळ खर्च केलात तर स्मरणचित्र हा विषय अवघड वाटणार नाही.
२) मानवाकृतींच्या हालचाली (वाकणे, पळणे, बसणे) काढण्यायीच सवय करा. त्यांच्या पोशाख पद्धतीचा विचार करा.
३) तुमची निरीक्षण शक्ती वाढवून पाश्र्वभूमीसंबंधी विचार करून ठेवा.
४) स्मरणचित्रात मुख्य विषयाकडे लक्ष द्या. तो विषय मध्यभागी काढून पूरक इतर घटकांची मांडणी करा.
५) चित्रात फार गर्दी नको व चित्राची चौकट रिकामी वाटणार नाही. अशी रचना करणे आवश्यक आहे.
६) रंगकामात फार किचकट काम न करता साधेपणा ठेवा. रंगकामात विविधता आणता यावी यासाठी तुमच्या चित्रात बारकावे रेखाटा. यासाठी उदा. माणसाचे जाकिट, फेटा, कौलारू घरे, झाडांच्या फांद्या यासारख्या घटकांचा वापर करून चित्र अधिक उठावदार करता येईल.
-सुनीती जाधव (आंबिलढोक)
प्राचार्या, चित्रलीला निकेतन, पुणे

क्रमशः

Jupiter's zodiacal change will be favourable for Students
गुरु ग्रहाच्या राशीपरिवर्तनाची होणार कृपा; ‘या’ राशीच्या विद्यार्थ्यांना मिळणार भरपूर यश
Nilkrishna Gajare
JEE Mains 2024 : महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या मुलाची जेईई मुख्य परीक्षेत बाजी, विद्यार्थ्यांना संदेश देत म्हणाला…
jee mains result 2024 marathi news
JEE Main Result 2024: जेईई मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, ५६ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण, नागपूरच्या निलकृष्ण गजरेने मारली बाजी…
loksatta analysis university grants commission two important decisions regarding phd admissions
विश्लेषण : पीएच.डी. प्रवेशांबाबतच्या दोन निर्णयांचे महत्त्व कोणते? त्यांचे विद्यार्थ्यांना फायदे किती?

आधीचे लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
स्थिर चित्र कसे काढावे? (भाग तीन)
रंगछटा हाच निसर्गचित्रणातील पहिला टप्पा (भाग दोन)
शासकीय ड्रॉईंग ग्रेड परीक्षेविषयी (भाग एक)