सुंदर आकार, रंगसंगती, विविधता यांच्या निर्मितीमधूनच ‘निसर्ग चित्रण’ हा विषय तयार होतो. पानाफुलांची सुंदर डहाळी घेऊन ती हुबेहूब रेखाटून त्यामध्ये निसर्गात आहेत त्या रंगछटा बनवून रंगकाम करणे, हा निसर्गचित्रणातील पहिला टप्पा होय.
फुलांच्या डहाळीचे नीट निरीक्षण करा. त्याचा आकार अभ्यासा. पाकळ्यांची ठेवण, जोड आणि देठ याकडे बारकाईने पाहा. या फुलाच्या डहाळीस असलेली पाने प्रथम दर्शनी हिरवी असतात, पण त्या प्रत्येक पानाच्या हिरवेपणात अन्य रंगांच्या छटा असतात. त्यामुळे ती पाने कोवळी तर निबरटपणाची दिसतात. प्रत्येक फुलाच्या पाकळीमध्ये देठाकडे व टोकाकडे वेगळी रंगछटा असते. पानाप्रमाणे फुलाची रचना नीट समजावून घेऊन रेखाटन करा. परीक्षेसाठी देण्यात येणा-या आणि सरावासाठी निसर्ग फुलांच्या पाकळ्यांची ठेवण मध्यापासून त्याची निर्मिती कशी झाली आहे. मध्यावर गेंद आहे की नाही या सर्व गोष्टींचे निरीक्षण केल्यावर हुबेहूब रेखाटा.
तुम्हास देणा-या येणा-या निसर्गचित्राचे आकारमान ठरविण्यासाठी पाने-फुले यांची टोकं अंदाजे लक्षात घेऊन जो बाह्य़ात्कार तयार होईल, तो अस्पष्ट स्वरूपात रेखाटा. नंतर पानाच्या डहाळीचा देठ मधे ठरवून रेखाटा. नंतर पानाच्या देठाकडील भागाकडून टोकाकडील भागाचे रेखाटन करा. फुलाच्या पाकळ्या मोजून काढण्याची गरज नसते. फुलांचे ताजे टवटवीत रूप तुमच्या नजरेत साठवा. कारण कालांतराने ते सुकते, कोमेजते व जसे ताजेपणी दिसते तसे काढावयाचा प्रयत्न करा. निसर्ग चित्रणाचे पेपरमध्ये तुम्हाला पानाफुलाचा अलंकारिक भाग रेखाटन / रंगकामासह दाखवावा लागतो. त्रिकोण, चौकोन, आयत, वर्तुळ किंवा अर्धवर्तुळ याचे रेखाटन अपेक्षित असते. पानाफुलाच्या संकल्पनात (डिझाइनमध्ये) कसा उपयोग होईल, असे अपेक्षित असते. यासाठी रंगाचे बंधन नसते. कितीही रंगछटामध्ये काम केले तरी मान्य असते.
१) नमुन्यासाठी ठेवलेल्या रोपाचे रेखांकनापूर्वी सूक्ष्म निरीक्षण करा.
२) रोप पाणी भरलेल्या बाटलीत अथवा ओल्या मातीच्या गोळ्यात खोचून ठेवा. अशा रीतीने ठेवल्यास २-३ तासांपर्यंत रोप सुकत नाही.
३) समग्र रोपामधून पाच किंवा सात पानांचेच रेखांकन करा. तसेच एक अथवा दोनच फुले चित्रीत करा. समग्र रोपाचे चित्रांकन करणे आवश्यक नाही.
४) चित्र काढताना सर्वप्रथम डहाळीचे रेखांकन करावे. नंतर पाने व फुले यांच्यासह केलेले रेखांकन कागदाच्या मध्यभागी येईल अशाप्रकारे करा.
५) पाने डहाळीला कशा रीतीने जोडलेली आहेत ते नीट पाहा. हे निरीक्षण करून पानातील मुख्य शिरा आणि पानाचा वक्रकार सूक्ष्मपणे बघून नंतरच निरीक्षणाप्रमाणे मुख्य चित्र काढायला सुरुवात करा.
६) समग्र रोपाचे निरीक्षण केल्यावर डहाळ्यांचा वरचा भाग बारीक व खालचा म्हणजे रोपाला जोडलेला भाग जाड आहे हे आढळून येईल.
७) चित्रात रंग भरताना छाया प्रकाशाच्या प्रमाणाने गडद अथवा फिके रंग द्या.
८) नाईलाज झाला तरच रेखांकन करताना रबर वापरा. स्वच्छ व सुबक रेखांकन असल्यास रंग देताना त्याचा फार उपयोग होतो.
९) चित्राला परत रंग देऊ नका. वारंवार रंग दिल्याने चित्र वाईट दिसते.
१०) डहाळ्या, पाने, फुले वगैरेचा आकार व रंग लक्षात घेऊन सुरेख आणि लयबद्ध रेघांनी आणि निसर्गसदृश जलंरंगांनी आकर्षक आणि अलंकृत आकार तयार करा.
लेखक/ मार्गदर्शक
सुनीती जाधव (आंबिलढोक)
प्राचार्या चित्रलीला निकेतन, पुणे
क्रमश:
संग्रहित लेख, दिनांक 11th Sep 2013 रोजी प्रकाशित
रंगछटा हाच निसर्गचित्रणातील पहिला टप्पा (भाग दोन)
सुंदर आकार, रंगसंगती, विविधता यांच्या निर्मितीमधूनच ‘निसर्ग चित्रण’ हा विषय तयार होतो.

First published on: 11-09-2013 at 01:00 IST
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: About drawing grade exmination part two