अनुपस्थित विद्यार्थ्यांची हजेरी दाखविणे, पैसे घेऊन जादा गुण देणे, उपस्थित विद्यार्थ्यांना अनुपस्थित दाखविणे, जादा शुल्कसाठी प्रात्यक्षिक परीक्षेस बसू न देणे अशा गैरव्यवहाराच्या बऱ्याच घटनांमुळे बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेत पारदर्शकता यावी म्हणून ‘इन कॅमेरा’ परीक्षा घेण्याची मागणी ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना’ या विद्यार्थी संघटनेने केली आहे.
बाह्य़ परीक्षकांऐवजी केवळ अंतर्गत परीक्षकांच्या उपस्थितीत प्रात्यक्षिके घेण्याची मोकळीक कनिष्ठ महाविद्यालयांना देण्याच्या ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’च्या निर्णयाचा निषेधही संघटनेने केला आहे.
मनविसेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. मनोज टेकाडे आणि अॅड. अजय तापकीर यांनी या संबंधात शालेय शिक्षण विभागाचे सचिव जे. एस. सहारिया यांना निवेदन दिले आहे.
दरवर्षी तीन ते चार लाख विद्यार्थी बारावी विज्ञान शाखेची परीक्षा देतात. बारावी प्रात्यक्षिक परीक्षेस उपस्थित राहणे आणि २० गुण प्राप्त करणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर २० गुणांचे प्रात्यक्षिक ३० गुणांचे करण्यात आल्याने गुणांची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने प्रात्यक्षिक परीक्षांना महत्त्व आले आहे.
राज्यातील अनेक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रयोगशाळांची अवस्था वाईट असते. ग्रामीण भागात काही महाविद्यालयांमध्ये तर प्रयोगशाळा नावालाच असतात. त्यात ३० गुण महाविद्यालयांच्या हातात गेल्याने विद्यार्थ्यांना शिक्षकांचे किंवा महाविद्यालयाचे अन्याय निमुटपणे सहन करावे लागणार आहेत.
मंडळाला आपल्या बारावीच्या प्रमाणपत्राचे महत्त्व अबाधित राखायचे असेल तर प्रात्यक्षिक परीक्षेत पारदर्शकता येणे आवश्यक आहे. प्रात्यक्षिक परीक्षांचे शुल्क विद्यार्थ्यांकडून घेतले जात असल्याने बाह्य़ परीक्षेच्या भत्याचा बोजा मंडळावर येत नाही. मग प्रात्यक्षिक परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने पावले न उचलता बाह्य़ परीक्षक नेमल्यावरही गैरप्रकार होतात म्हणून संपूर्ण जबाबदारी अंतर्गत परीक्षकांवर टाकणे कितपत संयुक्तिक आहे, असा सवाल अॅड. टेकाडे यांनी केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा