स्त्री-पुरूष समानतेचे बीज रुजवण्यासाठी व उच्च शिक्षणातील मुलींचा टक्का वाढवण्यासाठी महाविद्यालयांतून राबवण्यात येणारा ‘जागर जाणिवांचा’ या उपक्रमाला राज्यभरातून निम्माच प्रतिसाद मिळाला आहे. ५० टक्के महाविद्यालयांनीच हा उपक्रम राबवला आहे. विद्यार्थ्यांची कल्पकता व प्रेरक शक्तीचा वापर करणे हे उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
‘जागर जाणिवांचा’ या अभियानाच्या माध्यमातून सर्व विद्याथी-विद्यार्थिनी, शिक्षक आणि महाविद्यालय प्रशासन इत्यादींना त्यांचे महत्त्व पटवून त्यांनी सक्रिय व सातत्यपूर्ण सहभाग घ्यावा या दृष्टिकोनातून जिल्हा, विद्यापीठ व राज्य स्तरावर महाविद्यालयांची स्पर्धा घेण्यात येणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने २३ ऑक्टोबर, २०१२ रोजी या संदर्भात आदेश काढले होते. मात्र, महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालयांपर्यंत हा उपक्रम न पोचल्याने राज्यभरातील केवळ एक हजार महाविद्यालयांनीच यात सहभाग नोंदविल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी दिली. हा उपक्रम राज्यभर विस्तारावा यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. या उपक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, अक्षरा सामाजिक संस्थेच्या नंदिता शहा, माजी सचिव चंद्रा अय्यंगार आदी मान्यवर उपस्थित होते. या अंतर्गत महाविद्यालयाचे मूल्यमापन करण्यासाठी निकष ठरविण्यात आले आहेत. स्त्री-पुरूष समानतेसाठी सूचना करणे, या सूचना अंमलात आणण्यासाठी कार्यपद्धती सुचविणे, महाविद्यालयात होणाऱ्या छेडछाडीमुळे मुलींच्या मनात असलेली भीती व असुरक्षिततेची भावना दूर करण्यासाठी होणारे प्रयत्न आदी निकषांवर हे पारितोषिक दिले जाणार आहे. ८ मार्चला महिला दिनाच्या दिवशी या पारितोषिकांचे वितरण करण्यात येईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा