अर्थशास्त्राचे प्राध्यापक डॉ. नीरज हातेकर यांचे निलंबन मुंबई विद्यापीठाने मागे घ्यावे यासाठी राज्यपालांना निवेदन देण्यासाठी राजभवनाच्या दिशेने निघालेल्या ‘आम आदमी पक्षा’च्या २० कार्यकर्त्यांना पोलिसांनी गुरुवारी दुपारी वाटेतच ताब्यात घेतले. रात्री उशीरापर्यंत त्यांना मलबार हिल पोलिस ठाण्यात डांबून ठेवले होते. ‘डॉ. हातेकर यांचे निलंबन मागे घ्या, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. यासाठी आम्ही शांतपणे कुलपतींना निवेदन देणार होतो. मात्र, वाटेतच केलेली ही कारवाई अनावश्यक व अतिरेकी आहे,’ अशा शब्दांत ‘आप’च्या प्रीती मेनन-शहा यांनी नाराजी व्यक्त केली.
टीस्सचा नोकरीचा प्रस्ताव
निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या डॉ. हातेकर यांना ‘टाटा सामाजिक विज्ञान संस्था’ (टिस्स) या नामवंत शिक्षणसंस्थेकडून प्राध्यापकपदाचा प्रस्ताव देण्यात आला आहे. ‘सेंटर फॉर ह्यूमन रिसोर्सेस मॅनेजमेंट अॅण्ड लेबर रिलेशन्स’ या विभागातील प्राध्यापकपदाचा हा प्रस्ताव आहे. डॉ. हातेकर यांनी यास दुजोरा दिला, मात्र आपण तो स्वीकारणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader