तंत्रज्ञानातील आविष्कारांचे दर्शन घडविणाऱ्या आयआयटीच्या प्रांगणात आता सामाजिक चर्चा रंगणार आहेत. नेहमी तंत्रज्ञानाच्या मदतीने सर्वसामान्यांचे जगणे सोपे करणारे आयआयटीमधील कुशाग्र मेंदू आता सामाजिक समस्यांना थेट भिडण्यासाठी प्रयत्नांना लागले आहेत. समाजातील अडचणी समजून घेऊन त्यावर उपाय शोधणे आणि त्यासंदर्भातील दिशा निश्चित करणे या उद्देशाने आयआयटी मुंबईमधील एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी १ आणि २ मार्च रोजी ‘अभ्युदय’ नावाचा महोत्सव आयोजित केला आहे.
या महोत्सवात व्याख्यानमाला, कार्यशाळा, समूह चर्चा, लहान मुलांसोबत एक दिवस, समस्यांवर उपाय शोधणे असे विविध उपक्रम आणि स्पर्धा होणार आहेत. व्याख्यानांमध्ये हिवरे बाजारचे पोपटराव पवार, माजी माहिती आयुक्त आणि प्लास्टिक पॅकिंगचे प्रणेते शैलेश गांधी, क्रेंब्रिज विद्यापीठातील ‘एम.पानी’ या संघातील अकांक्षा हझारी, एमआयटीमधील ‘पॉवर्टी अॅक्शन लॅब’ची प्रिया नाईक, ई-कोचिंग करणारा कृष्णा रामकुमार, आआयटी मद्रासचे माजी विद्यार्थी आणि सनदी अधिकारी समीर कुमार बिश्वास, ‘कोशीश’ या सामाजिक संस्थेची स्थापना करणारा तारीक मोहम्मद आदींचा समावेश असणार आहे. याशिवाय शिक्षण या विषयावर कृष्णा कुमारसोबत समूह चर्चा होणार आहे. तर, ग्रामीण विकासाबद्दल पोपटराव पवार यांच्याशीही विद्यार्थ्यांची समूह चर्चा होणार आहे. तर सोशल व्हेंचर स्थापन करण्याविषयी प्रिया नाईक हिच्यासोबत आणि समाजाच्या गरजा समजून घेणे या विषयावर तारीक मोहम्मद यांच्या कार्यशाळा होणार आहेत, अशी माहिती महोत्सवाचा विपणन आणि प्रसिद्धी प्रमुख रणजित गखारे याने दिली.
निवडणुका डोळय़ासमोर ठेवून महोत्सवात स्पध्रेचे आयोजन करण्यात आले असून विविध क्षेत्रातील राष्ट्रीय पातळीवरील समस्या शोधून त्यावर उपाय सुचवण्याची एक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. याचबरोबर ‘बिहाइंड द फ्रेम : डिग्निटी ऑफ लेबर’ या स्पध्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आपल्या घरात काम करणारे गडी किंवा सुरक्षा रक्षक अशा व्यक्तींशी चर्चा करून एका छोटा लेख फोटोसह तो सादर करावयाचा आहे. या सारख्या स्पर्धाही यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या महोत्सवात सर्वात चांगली कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांला राष्ट्रीय पातळीवरील काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेत काम करण्याची संधीही देण्यात येणार आहे. या संदर्भातील अधिक माहिती http://abhyuday-iitb.org या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. येथे नाव नोंदणीही करू शकता.
ऑडिओ बुक्सही!
अंध विद्यार्थ्यांसाठी काही निवडक पुस्तकांचे ध्वनिफितीत रूपांतर करून आयआयटीमधील काही मुले ऑडिओ बुक्स तयार करणार आहेत. त्यासाठी संकुलातील ऑडिओ स्टुडिओ विद्यार्थ्यांना खुला करून दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आयआयटीअन्स पुस्तकांचे वाचन करून त्याच्या ध्वनिफिती तयार करणार आहेत. यादरम्यान तयार झालेल्या ध्वनिफितींचे वाटप अंध शाळांना करण्यात येणार आहे.

Story img Loader